राज ठाकरेंनी का पाठवलं पंतप्रधान मोदींना पत्र?

Share This News

मुंबईः राज्यात बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. राज्याला स्वतंत्रपणे लसखरेदीची मुभा देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
कोरोनाच्या संसर्गात महाराष्ट्र सध्या देशात अव्वल ठरतो आहे. परिस्थिती चिंताजनक बनलेली असल्यानेच बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक असून कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी लागू करणे राज्याला परवडणारे नाही, असे राज यांनी नमूद केले आहे. या परिस्थितीत शंभर टक्के लसीकरण अत्यावश्यक असून अल्प कालावधीत आवश्यक तेवढ्या लशी राज्याला पुरविण्यात याव्या, महराष्ट्राला स्वतंत्रपणे लसींची खरेदी करू द्यावी, अशी विनंती ठाकरे यांनी केली आहे. राज्यातील खासगी संस्थांनाही लसींच्या खरेदीची मुभा मिळावी, सिरमला राज्यात मुक्तपणे लसींच्या विक्रीची परवानगी मिळावी, राज्यातील हाफकिन सारख्या संस्थांना लस उत्पादनाची मुभा मिळावी अशी मागणीही राज ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.