वन्यजीव भ्रमणमार्ग धोकादायक
छत्तीसगड, ओडिशा, आंध्रप्रदेश, तेलंगणातील व्याघ्रसंख्येत भर घालण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल हा भ्रमणमार्ग वन्यप्राण्यांसाठी जणू मृत्यूमार्ग ठरत आहे. शमन उपायांअभावी या भ्रमणमार्गावर गेल्या दहा वर्षांत वाघ, बिबटय़ांसह सुमारे शंभर वन्यजीवांचा बळी गेला आहे. दरम्यान, रस्ते विकास व महामार्ग मंत्रालयाने शमन उपायांसाठी हात आखडता घेतला असताना, राष्ट्रीय हरित लवादाने मात्र राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिलेल्या कृ ती आराखडय़ाचे पालन के ल्याशिवाय रस्ते प्रकल्प समोर जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीवरच आता वन्यजीवांची सुरक्षा अवलंबून आहे.
ताडोबा-अंधारी, बोर, नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प तसेच इंद्रावती, कावल आणि घोडाझरी अभयारण्यांना जोडणाऱ्या वन्यजीव भ्रमणमार्गाला नऊ रस्ते प्रकल्पांमुळे अडथळा निर्माण होत आहे. त्याची दखल घेत राष्ट्रीय हरित लवादाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे केलेल्या शिफारशीनुसार, या भ्रमणमार्गावर रस्त्यांचे काम करण्याचे निर्देश रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला जानेवारी २०२० मध्ये दिले. त्यावर हरकती असल्यास १५ दिवसांच्या आत त्या मांडण्यास सांगितले. त्यानंतर १७ जानेवारीला रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने लवादासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात चार रस्त्यांवरील रस्ते निर्माणाचे काम प्राधिकरणाच्या निर्देशानुसार करण्याची सहमती दर्शवत त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद के ल्याचे सांगितले. तसेच तीन वर्षांत काम पूर्ण करण्याची हमी दिली. मात्र, चंद्रपूर-मूल, बामणी-नवेगाव रस्त्यांसाठी अतिरिक्त खर्चाची तरतूद करण्याबाबत असमर्थता दर्शवली. राज्याच्या वनखात्याने त्यासाठी निधी द्यावा, अशी मागणीही केली. त्यानंतर सात जुलैला लवादाने सर्व युक्तिवाद व मागील आदेश विचारात घेऊन प्राधिकरणाने तयार केलेल्या कृ ती आराखडय़ाचे पालन के ल्याशिवाय रस्ते विकास व महामार्ग मंत्रालयाचा प्रकल्प समोर जाऊच शकत नाही, असा निर्णय दिला. त्यामुळे मंत्रालय लवादाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार की कसे, यावरच वन्यजीवांची सुरक्षा अवलंबून आहे.
भ्रमणमार्गावर वाघाची घनता अधिक
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून तयार करण्यात येणारे हे नऊ रस्ते ज्या ताडोबा-अंधारी, बोर, नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प तसेच इंद्रावती, कावल आणि घोडाझरी अभयारण्यांना जोडणाऱ्या वन्यजीव भ्रमणमार्गाला अडथळा ठरतात, त्या भ्रमणमार्गावर वाघाची घनता अधिक आहे. चंद्रपूर-मूल आणि बामणी-नवेगाव हे दोन रस्ते ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या वाघाच्या महत्त्वपूर्ण मार्गातून जातात. तसेच छत्तीसगड, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि तेलंगणासाठीही हा भ्रमणमार्ग महत्त्वाचा आहे.
विदर्भ आणि मध्य भारतात रस्ते विकासकामे सुरूच असून या विकासकामांचे स्वागत आहे. मात्र, हे रस्ते वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गातून जात आहेत. चंद्रपूर-मूल हा रस्ता वन्यप्राण्यांसाठी अधिक धोकादायक ठरत आहे. येथे वाघ आणि बिबटय़ांचा बळी गेला आहे. त्यामुळे या मार्गावर प्राधान्याने शमन उपाय होणे आवश्यक आहे.
– बंडू धोतरे, सदस्य, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ.