वर्ध्यात बसस्थानकावर घोळक्यातून मोबाईल चोरणाऱ्या महिलेला अटक, 41 हजारांचे मोबाईल जप्त
वर्धा : वर्धा बसस्थानकावर विद्यार्थिनींच्या घोळक्यात बसून मोबाईल लांबविणाऱ्या चोर महिलेला शहर पोलिसांनी अटक केली आहे. तिने वर्धाच नाही, तर जाम येथील बसस्थानकावरुनही अनेक मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. तिच्या जवळून तब्बल 41 हजार रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत
घोराड येथील श्वेता संजय कुत्तरमारे राहणार घोराड ही मुलगी रोजगारासंदर्भात माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात आली होती. काम आटोपून गावी परत जाण्यासाठी बस स्थानकावर आली. ती बसमध्ये चढत असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने बॅग मधून तिचा मोबाईल लांबविला. याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी तपास करुन 24 तासात या घटनेतील आरोपीला अटक केली. पोलिसांनी बसस्थानकावर संशयित रित्या वावरत असलेल्या मोनाली पांडुरंग घाटुले राहणार शेडगावला ताब्यात घेतले. महिलेला पोलिसी हिसका दाखविताच तिनेच चोरी केल्याची कबुली दिली. तिने गुन्ह्यात चोरी गेलेला मोबाईल आणि इतर तीन मोबाईल दिले. तिने जाम बस स्टॉपवरुनही मोबाईल चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी महिला चोराकडून तब्बल 41 हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत. या महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिने आणखी कुठे चोरी केलीये का याचाही तपास पोलीस घेत आहेत