पाटणा : आयआरसीटीसी घोटाळा म्हणजेच जमीनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये नोकरी घोटाळ्यात सीबीआयने बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी छापे टाकले आहेत (CBI Raid on Rabri Devi Residence). सोमवारी सकाळीच सीबीआयने छापे टाकले असून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव देखील यावेळी घरीच असल्याची माहिती आहे. या घोटाळ्यात न्यायालयाने लालूप्रसाद यादव, राबडी देवी, मीसा भारती यांच्यासह १४ आरोपींना समन्स जारी केले होते. या सर्व कथित आरोपींना १५ मार्चला न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणात सीबीआयने आरोपपत्र देखील दाखल केलेले असून त्यात लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय माजी आमदार भोला यादव, ह्रदयानंद चौधरी यांच्यावर देखील आरोप आहेत.
सीबीआय सूत्रानुसार, आमदार भोला यादव हे २००४ ते २००९ मध्ये लालू प्रसाद यादव यांचे ओएसडी होते. हा घोटाळा तब्बल १४ वर्षे जुना आहे. त्यावेळी लालू प्रसाद यादव हे युपीए सरकारमध्ये २००४ ते २००९ दरम्यान रेल्वेमंत्री होते. त्यावेळी ७ लोकांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात रेल्वेत नोकरी दिल्याचा आरोप आहे. लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाने थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १.०५ लाख चौरस फुट जागेवर अवैध ताबा मिळविल्याचा सीबीआयचा दावा आहे. गेल्यावर्षी १८ मे या प्रकरणी एक गुन्हा नोंद केला होता. अलिकडेच राजदचे सर्वेसर्वा यांचे सिंगापूर येथे किडनी ट्रान्सप्लांट झाले आहे.