उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यातील बैठक अचानक रद्द

0

मुंबई : शिवसेनेचे ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडीत युती होणार आहे. या युतीपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी बैठक नियोजित होती. (Prakash Ambedkar & Uddhav Thackeray Meeting) मात्र, ही बैठक अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. ही बैठक का रद्द करण्यात आली, याची माहिती पुढे आलेली नाही. या दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या असून वंचित बहुजन आघाडीने युतीसाठी हिरवा कंदील दाखविल्यावर आता अंतिम निर्णय घेण्यापूर्वी ठाकरे व आंबेडकर यांच्यात चर्चा होणार आहे. या दोन पक्षात ही युती होणार असली तर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत प्रवेश मिळेल काय, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. वंचित बहुजन आघाडीने देखील हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे या दोन पक्षांच्या युतीनंतर महाविकास आघाडीचे काय होणार हे देखील अस्पष्ट आहे. आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याची घोषणा वंचितकडून करण्यात आली. त्यानंतर आज वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांची आज पहिली बैठक होणार आहे. आंबेडकर यांनी ठाकरेंसोबत युती करण्याआधी महाविकास आघाडीमधील वंचितच्या स्थानाबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. त्याबाबत ठाकरे गट आता काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलेले आहे. अजित पवार यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी देखील याबाबत सकारात्मकता दर्शवली होती.शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे