कर्नाटकने घेतला गनिमी काव्याचा धसका, सीमेवर वाहनांची कसून तपासणी
महाराष्ट्रातील मंत्र्यांचा दौरा रद्दच

0

मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या नेत्यांमध्ये तणातणी सुरु असताना महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा दौरा रद्द झाला असला तरी मंत्री गनिमी काव्याने बेळगावात प्रवेश करतील या धसक्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची सीमेवर (Maharashtra-Karnataka Border) कसून तपासणी सुरु असल्याची माहिती आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असला तरी कर्नाटकच्या पोलीस खात्याने बेळगाव जिल्ह्याच्या सगळ्या सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. पाच ते सहा प्रवेश मार्गांवर तपासणी नाकी पोलिसांकडून उभारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील तपासणी नाक्यांवर तैनात करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी राज्य सरकारच्या मंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनेनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील मराठी भाषिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई कर्नाटकात जाणार होते. मात्र, कर्नाटकने मंत्र्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. त्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे केले आहे.
प्रतिबंध आदेश
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई तसेच खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्यात आला असल्याचा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी काढले आहेत. बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि खासदार धैर्यशील माने यांना आज बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटलेले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा