महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप : जिप वर्तुळात खळबळ
गडचिरोली. विनाकारणच महिला कर्मचाऱ्याला आपल्या कक्षात बोलावून गडचिरोली जिल्हा परिषदेतील (Gadchiroli Zilla Parishad ) लेखा व वित्त अधिकाऱ्याने (Accounts and Finance Officer in Zilla Parishad ) विनयभंग (molestation) केला. याप्रकाराने हादरलेल्या महिला कर्मचाऱ्याने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी स्वतः प्रकरणाता लक्ष घातले. तातडीने अधिकाऱ्याचा शोध सुरू करण्यात आला. सुमारे तासभर शहरात शोधाशोध केल्यानंतर चंद्रपूर मार्गावरील हॉटेल लॅण्डमार्ग जवळ अटक केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ओमकार अंबपकर (५४, रा. कोल्हापूर) असे अटक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अंबपकर हे मुळचे अंबप ता. हातकंगले जि. कोल्हापूर (kolhapur) येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कर्मचारी ही गडचिरोली जिल्हा परिषदेत कार्यरत आहे. आरोपी लेखा व वित्त अधिकारी ओमकार अंबपकर याने १६, १७ व १८ नोव्हेंबरला लागोपाठ तीन दिवस पीडित महिला कर्मचाऱ्याला कार्यालयीन कामाच्या बहाण्याने आपल्या कक्षात बोलावून नको त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सततचा त्रास सहन न झाल्याने पीडितेने आरोपी लेखा व वित्त अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यावरुनच अंबपकर याला अटक केली. त्याच्यावर विनयभंगासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालून महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठी कायदा तयार करण्यात आला. याशिवाय महिलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आस्थापनेच्या ठिकाणी समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. यानंतरही काही नराधमांकडून मात्र सहकारी महिला कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार सरूच असतात. बरेचदा बदनामी आणि कारवाईच्या भीतीने महिला कर्मचारी तक्रार करण्याचे धाडस करीत नाही, यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांची हिंमत वाढत जाते. गडचिरोली जिपतील कर्मचारी महिलेने दाखविलेल्या धाडसाचे कौतूक केले जात आहे.