छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात परत आणणार: सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात परत आणणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) केली आहे. मुनगंटीवार यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ब्रिटनहून भारतात आणण्याचे प्रयत्न केंद्र सरकारच्या मार्फत होणार असल्याची माहिती दिली होती. शिवराज्याभिषेक दिनाला 2024 साली 350 वर्षे पूर्ण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.
सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं पुन्हा भारतात यावीत यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा सुरू आहे. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी वाघनखे राज्यात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. छत्रपती शिवरायांनी वापरलेली वाघनखे सध्या ब्रिटनमध्ये आहेत. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरली होती.
या आधी शिवरायांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही तलवार सध्या इंग्लंडच्या राणीचे वैयक्तिक संग्रहालय रॉयल कलेक्शन ट्रस्ट येथे ठेवण्यात आली असल्याचे सांगितले जाते. ही तलवार आणण्याचे प्रयत्नही केंद्र सरकारच्या पातळीवर होणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.