मुंबई: प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी ‘मुस्लिम पर्सनल लॉ’वर टीका केली आहे. या कायद्यावर कठोर प्रहार करताना त्यांनी एक वादग्रस्त विधानही (Javed Akhtar`s comment on Muslim Personal Law) केले आहे. जर मुस्लिम पतीला एकाच वेळी चार लग्न करण्याचा अधिकार असतील तर महिलांनाही एकापेक्षा जास्त पती असण्याचा अधिकार असायला हवा, असे ते म्हणाले. एकाचवेळी अशाप्रकारे एकापेक्षा जास्त लग्न करणे हे देशाचा कायदा आणि संविधानाच्या नियमांविरोधात आहे. भारतासारखी विविधता असलेल्या देशात एकच कायदा लागू केला जाऊ शकतो का, हा वादाचा मुद्दा असला तरी पर्सनल लॉ आणि संविधान यापैकी एकाची निवड करावी लागली तर मी कायम संविधानाची निवड करेन, असेही जावेद अख्तर म्हणाले.
देशात समान नागरी कायदा लागू करण्याची चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर अख्तर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. समान नागरी संहितेचा अर्थ सर्व समुदायांसाठी एकच कायदा असा होत नाही. याचा अर्थ पुरुष आणि स्त्रियांमध्ये समानता हवी. दोघांसाठीही सारखे मापदंड असायला हवे. मी स्वतः समान नागरी कायद्याचे पालन करतो. ज्यांना पुरुष आणि स्त्रियांना समान स्थान मिळावे असे वाटते, त्यांनी समान नागरी कायद्याचे पालन करायला हवे. ‘मी माझ्या संपत्तीची वाटणी मुलगा आणि मुलींमध्ये समान करेन, त्यांच्यात भेदभाव करणार नाही, असेही जावेद अख्तर म्हणाले. आज देशाला सरकार आणि सरकारला देश मानले जात आहे. सरकार येत-जात राहील पण देश कायम राहील, असे ते म्हणाले.
