उमरेड : नागपूर जिल्ह्यातील पोलिसांच्या गृहनिर्माण कार्याला अधिक गती देण्याबाबत आपण दक्ष असून लवकरच सर्व प्रकल्प पूर्णत्वात जातील,अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis on Police Housing Projects) यांनी आज येथे दिली. उमरेड पोलीस स्टेशन परिसरात बांधून तयार झालेल्या पोलीस निवासस्थान इमारतीचे श्री. फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी ते बोलत होते. खासदार कृपाल तुमाने,आमदार सर्वश्री राजू पारवे, चंद्रशेखर बावनकुळे,टेकचंद सावरकर, विशेष पोलीस महासंचालक छेरींग दोरजे, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, उप विभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे,उमरेड पोलीस ठाणेदार प्रमोद घोंगे, पोलीस दलातील अन्य अधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पोलीसगृहनिर्माण महामंडळाने राज्यातील पोलिसांच्या निवासस्थानाची कामे हाती घेतली आहे. या अंतर्गत उमरेड येथील पोलीस निवासस्थानाचे काम 2018 मध्ये सुरू झाले. अवघ्या दोन वर्षात ही इमारत तयार झाली याचे समाधान व आनंद आहे. मुख्यमंत्री असतानाच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या घराची कमतरता राहणार नाही यासाठी आपण धोरण आखले होते. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील पोलीस निवासस्थानांच्या कामांना गती देऊन पोलीस दलाला दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्यात येतील. उमरेड पोलीस निवासस्थान इमारतीमध्ये टाईप-२ इमारती असून प्रत्येक इमारतीमध्ये १२ निवास अशी एकूण २४ निवासस्थाने आहेत.याशिवाय टाईप -३ व टाईप- ४ चे एक – एक निवासस्थान आहे. या बांधकामासाठी ७ कोटींचा खर्च आला असून दोन वर्षात सुंदर इमारत बांधून तयार झाली आहे.