
मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून भाजपने संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर केली आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नागपूर शहर व जिल्हा अध्यक्षपदावर अनुक्रमे बंटी कुकडे आणि माजी आमदार सुधाकर कोहळे यांची नियुक्ती झाली आहे. चंद्रपूर शहर व चंद्रपूर ग्रामीण अध्यक्षपदी अनुक्रमे राहुल पावडे आणि हरिश शर्मा यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. भंडारा व गोंदिया जिल्हाध्यक्ष पदांवर अनुक्रमे प्रकाश बाळबुधे आणि यशुलाल उपराळे यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. अमरावती शहर व ग्रामीण अध्यक्ष पदांवर अनुक्रमे प्रवीण पोटे व खासदार अनिल बोंडे यांची तर अकोला शहर व ग्रामीणवर अनुक्रमे जयंत मसने व किशोर मांगटे यांची अध्यक्ष पदांवर नियुक्ती झाली आहे. वाशिम जिल्हाध्यक्ष पदावर श्याम बढे तर यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी तारेंद्र बोर्डे, बुलडाणा अध्यक्षपदी गणेश मांडे यांची नियुक्ती झाली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियुक्त्या करीत पदाधिकाऱ्यांना पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बावनकुळे म्हणाले, मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे, असेही ते म्हणाले.