नागपूर. आपल्या अडीच वर्षांच्या मुलासह काही कामाने जात असलेल्या महिलेवर मागून दुचाकीने आलेल्या दोघांनी अॅसिड फेकले (Acid attack). ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी यशोधरानगरच्या विनोबा भावेनगरात (Vinoba Bhavenagar in Yashodharanagar) घडली. या हल्ल्यात मायलेक दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर मेयो रुग्णालयात (Mayo Hospital) उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र पोलिस अॅसिड हल्ला झाल्याचे नाकारत आहेत. लता पुराणिक वर्मा (24) रा. गल्ली क्र. 1, विनोबा भावेनगर असे जखमी महिलेचे नाव आहे. लता गृहिणी आहे. तिचे पती पुराणिक हे ड्रायव्हरचे काम करतात. रविवारी सकाळी पुराणिक काही कामाने बाहेर गेले होते. 10 वाजताच्या सुमारास लताही बाळाला सोबत घेऊन काही कामाने जाण्यासाठी घरून निघाली. घरापासून काही अंतरावर असतानाच दुचाकीस्वार दोन आरोपी मागून लता जवळ आले. काही समजण्यापूर्वीच त्यांनी लतावर अॅसिड फेकले आणि भरधाव निघून गेले. सुदैवाने त्यांचा नेम चुकल्यामुळे लता आणि तिच्या बाळावर जास्त अॅसिड पडले नाही. दोघांच्या हात व पोटाला दुखापत झाली.
महिलेवर अॅसिड हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलिसात खळबळ उडाली. तात्काळ लताला उपचारार्थ मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळावर पोहोचले. लता व तिच्या बाळाला गंभीर दुखापत नाही. ते धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लतावर फेकण्यात आलेले ज्वलनशिल पदार्थ नेमके काय होते, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी लताची विचारपूस करून आरोपींबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांना पाहिले नसल्याचे लताने सांगितले. हल्ल्याचे कारणही तिला माहिती नाही. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लताच्या पतीचा कोणाशी तरी वाद सुरू आहे. वैमनस्यातून लतावर हल्ला करण्यात आला, मात्र स्पष्ट काहीही सांगता येऊ शकत नाही. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासत आहेत. रविवारी घडलेल्या या घटनेची सोमवारी सकाळपासूनच सर्वत्र चर्चा सुरू झाली. हळुहळु समाजमन तापते आहे. यामुळे पोलिसांवरही आरोपींचा शोध लावण्याचे दडपण वाढले आहे.
