आई व वडील गंभीर जखमी ; शिवनी शिवारातील घटना
रामटेक (नागपूर). मुलगी बघून परत येत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशझोतात चालकाचे डोळे दिपले आणि कार अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या शेतात शिरून उलटली. यात तरुणाचा मृत्यू झाला (Accidental death of youth ) तर त्याचे आईवडील गंभीर जखमी झाले. ही घटना रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक-तुमसर मार्गावरील शिवनी (भोंडकी) (Shivni on Ramtek-Tumsar road within Ramtek police station limits ) शिवारात घडली. अतुल जीवनलाल कावरे (२८) असे मृताचे, तर जसवंता कावरे व जीवनलाल कावरे अशी जखमी आईवडिलांची नावे आहेत. तिघेही गोबरवाही, ता. तुमसर, जिल्हा भंडारा (Bhandara) येथील रहिवासी आहे. यंदा अतुलच्या लग्नाचा बार उडवायचाच या निर्धाराने कावरे कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला होता. त्याला स्थळही चालून येत होते. तो आईवडिलांसोबत नागपूर शहरात मुलगी बघण्यासाठी गेला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर तिघेही कारने (एमएच-०५/एजे-६६८७) रामटेकमार्गे परतीच्या प्रवासाला निघाले. अतुल कार चालवित होता.
शिवनी (भोंडकी) शिवारात विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशझोतात अतुलचे डोळे दिपले आणि त्याचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला. त्यामुळे ती कार रोडलगतच्या धानाच्या बांध्यात शिरली व उलटली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. अतुलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघात झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिसांना सूचना देत तिघांनाही रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले.
तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती अतुलला मृत घोषित केले, तर जीवनलाल व जसवंता यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना कामठी शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची व्यवस्था केली. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मनसर ते माहुली रस्त्यावर अपघातात एक ठार
वाहनाच्या धडकेमुळे मोटारसायकलस्वार युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना मनसर ते माहुली रस्त्यावर घडली. चेतन गणेश कुंभरे (२५) रा. दाहोदा, भट्टीटोला, तालुका रामटेक असे मृताचे नाव आहे. मनसर ते माहुली रस्त्यावर डोलामाईन शिवारातून जात असताना चेतनच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तो मृतावस्थेत पडून होता. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर माहुलीचे पोलिस पाटील ज्ञानेश्वर बिऱ्हो यांना अपघाताची माहिती देण्यात आली. त्यांनी पारशिवणी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीकरिता पारशिवणी येथील ग्रामिण रुग्णालयात पाठविला.