राज्यातील ३४ किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांकरीता जन-सुविधा केंद्राची उभारणी करण्यात येणार: सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

0

 

मुंबई : “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” कार्यक्रमातर्गंत राज्यातील ३४ किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांकरीता जन-सुविधा केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या जनसुविधा केंद्रात पुरुष-महिला स्वच्छतागृह, शिशू काळजी केंद्र, अल्पोपहार केंद्र इत्यादी सोयीसुविधांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar)यांनी विधानसभेत सांगितले.
याबाबत विधानसभा सदस्य संग्राम थोपटे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले,राज्यातील ३८७ स्मारकांच्या ठिकाणी क्युआर कोडसह त्या त्या स्मारकाची पुर्ण माहिती असणारे फलक लावण्यात येणार आहेत. जेणेकरून स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना त्या स्मारकाची माहिती मिळेल.गड किल्ल्याचे पावित्र्य आणि
स्वच्छता राखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये पावित्र्य भंग करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे . तर स्मारकांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांची माहिती सांगणा-यांना बक्षीस देखील देण्यात येणार आहे.
केंद्र संरक्षित शिवनेरी, सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांसाठी सर्वकष स्थळ विकास आराखडा तयार करण्यात आला असून केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी राज्य शासनामार्फत सादर करण्यात आला आहे. किल्ल्यांच्या ठिकाणी राज्य पुरातत्व विभागास जतन व संवर्धनाचे काम तसेच पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम करण्यास परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे.येत्या काळात महावारसा योजना राबविण्यात येणार असून सामाजिक उत्तरदायित्व निधी, ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यामध्ये सामावेश करण्यात येणार असल्याचे ना.श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.
या चर्चेत विधानसभा सदस्य भीमराव तापकीर, सुभाष धोटे यांनी सहभाग घेतला.

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा