भद्रावती टेराकोटा पॉटरी सेंटरला १0 कोटी

नागपूर
ग्रामोद्योग संघातर्फे चालविण्यात येणार्‍या भद्रावतीच्या टेराकोटा पॉटरी सेंटर उत्कृष्टता आणि संशोधन प्रशिक्षणाचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी १0 कोटी रुपये देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली.

भद्रावतीच्या टेराकोटा सेंटरला गुरुवारी त्यांनी भेट देऊन सेंटरवरील कामाची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी एसपी मिर्शा, लाडे, एन. के. शर्मा व ग्रामोद्योग संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले, १९५६ मध्ये स्थापना झालेली ही जुनी संस्था आहे. पण, काळानुरूप बदल होऊ शकले नाही. असे असले तरीही या कलेला जिवंत ठेवण्याचे काम ग्रामोद्योग संघाने केले आहे.

या कलेचा विकास व्हावा आणि चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील तरुण व महिलांना रोजगार मिळावा. रोजगार हा ग्रामीण भागात मिळावा ही आमची प्राथमिकता असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, एमएसएमईच्या स्फूर्ती योजनेत १.८0 कोटी रुपये या संस्थेला मंजूर झाले आहेत. आगामी वर्षभरात हे काम पूर्ण होईल. उत्कृष्टता आणि संशोधन व प्रशिक्षण तसेच ‘रेड क्ले पॉटरी’चे जगातील पहिले केंद्र भद्रावतीत सुरू होणार असून, या कामासाठी मी १0 कोटी रुपये केंद्र शासनातर्फे देण्याची घोषणा करीत असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, विविध आकर्षक डिझाईन येथे तयार व्हावेत.

तसेच येथे जे कारागीर प्रशिक्षण घेतील ते आपल्या गावात जाऊन उद्योग सुरू करतील व स्वत:चा रोजगार मिळवतील, ही अपेक्षा आहे. या विकास योजनेचा शुभारंभ झाला असून, जागतिक दर्जाचे हे केंद्र असल्यामुळे भद्रावतीचे नाव आता जगाच्या नकाशावर जाईल. या कामासाठी सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळणार आहे.

तसेच येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर किती लोकांना रोजगार मिळाला, हे पाहूनच या केंद्राचे मूल्यांकन करता येईल. येथे हॉस्टेल आणि उत्तम इमारत बनविण्याची सूचनाही गडकरी यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.