चितारओळी परिसरात ११ पीओपी मूर्ती जप्त

नागपूर
नागपूर महानगरपालिकेतर्फे पीओपी मूर्तीच्या खरेदी व विक्रीवर बंदी असूनही काही मूर्ती विक्रेते पीओपी मूर्तींची विक्री करीत आहेत. यासंबंधी प्राप्त माहितीच्या आधारे मनपाच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (६ सप्टेंबर) चितारओळी परिसरात पीओपी मूर्ती विक्रेत्यांविरुध्द कारवाई केली. गांधीबाग झोन अंतर्गत उपद्रव शोध पथकाने ११ मूर्ती जप्त करून ५६,000 रुपये दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या संदर्भात नुकतेच आदेश निर्गमित केले होते.
महापौर दयाशंकर तिवारी यांनीसुध्दा मनपा प्रशासनाला पीओपीची मूर्तींची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार चितारओळी भागात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईचे नेतृत्व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले व उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांनी केली. जप्त केलेल्या पीओपी गणेश मूर्ती झोनच्या आरोग्य अधिकार्‍यांकडे सुपूर्द केल्या.
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.