पुण्यात १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

८ जणांना अटक महाराष्ट्र हादरवणारी घटना

पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात संतापजनक आणि किळसवाणी घटना घडली आहे. तब्बल आठ नराधमांनी मिळून अवघ्या १३ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या अशा घटनांमुळे या पुरोगामी महाराष्ट्राची नेमकी वाटचाल आता कोणत्या दिशेला होत आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्राची एक वेगळी आणि चांगली ओळख आहे. पण महाराष्ट्राच्या पोटात विशेषत: पुण्यात अशा प्रकारची घटना उघड झाल्याने मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे गेली होती. तेव्हा तेथील एका रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेत रिक्षात बसविले आणि नंतर थेट एका खोलीत घेऊन गेला. तिथे तिच्यावर आठ जणांनी बलात्कार केला. त्यामध्ये सहा रिक्षाचालक आणि दोघे रेल्वेमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. या घटनेची माहिती मिळताच, रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे, आठही आरोपींना काही तासात ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना ही ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती पीडितेने दिली आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.