

अजित पवारांची खोटक टोलेबाजी
नागपूर. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Leader of Opposition in Legislative Assembly and leader of NCP Ajit Pawar ) सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा गेले काही दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना नेत्यांकडून याबाबत उघडपणे प्रतिक्रिया दिली जात आहे. त्यातच नागपूरमध्ये होऊ घातलेल्या वज्रमूठ सभेच्या (Vajramooth meeting ) निमित्ताने अजित पवार नागपुरात (Nagpur) दाखल झाले आहेत. त्यांनी या चर्चेला खोचक प्रत्युत्तर दिले. मला एक कळत नाही की माझ्यावर सगळ्यांचे प्रेम एवढे का ऊतू चालले आहे? दोन दिवस बघतोय, गुलाबराव पाटील बोलले, उदय सामंत बोलले, दादाजी भुसे बोलले. अनेकांची वक्तव्य मी ऐकली. या सगळ्यांचे एवढं प्रेम का उतू चालले आहे ते कळायला मार्ग नाही. मी माझी भूमिका तुमच्यासमोर ठेवली आहे. इथेही अजित पवार येणार की नाही? आले तर भाषण करणार की नाही करणार? बसणार तर कुठे बसणार? अशी चर्चा लोकांनी सुरू केली होती, अशी मिश्किल टोलेबाजीही त्यांनी केली. नागपुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधला. फडणवीसांच्या होम पीचवर ही सभा होत असल्याचेही बोलले जात आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात कुणाचे ना कुणाचे होम पीच असणारच आहे. आम्ही राज्याच्या वतीने तिथे सभा घ्यायला जातोय. जसे त्यांचे होम पीच आहे, तसे अनिल देशमुख, सुनील केदारांचेही होम पीच आहे. नितीन राऊतांचेही होम पीच आहे, असे ते म्हणाले. अजित पवार आणि अमित शाह यांची गुप्त भेट झाल्याच्या चर्चेलाही त्यांनी पूर्णविराम लावला. त्यांना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात भेट कुठे झाली? केव्हा झाली? मुंबईत अमित शाह उतरल्यापासून सगळे चॅनल त्यांच्या पाठिशी होते. तिथून ते विनोद तावडेंच्या घरी गेले. तिथून ते सह्याद्रीला गेले. मी कालच नागपुरात येणार होतो. पण, सभा संध्याकाळी असल्यामुळे अनिल देशमुखांशी बोलणे झाले. इथे एक कार्यक्रम आहे, तो करून दुपारी अनिल देशमुखांकडे आमचे जेवण आहे. त्यामुळे या सगळ्या बातम्या बिनबुडाच्या आहेत. अशा गोष्टी लपून राहात नसतात. त्यामुळे कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचे काम कुणीही करू नये, असे ते म्हणाले.