बद्रीनाथ, (BDRINATH) ५ मे : उत्तराखंडमधील जोशीमठजवळ भूस्खलन झाल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. येथील हेलांग खोऱ्यात जलविद्युत प्रकल्पासाठी एनटीपीसीकडून बोगद्याचे काम सुरू आहे. काल दरीत खाली काही बांधकाम सुरू असताना स्फोट झाला. त्यानंतर डोंगराचा एक भाग तुटून रस्त्यावर पडला, असा दावा केला जात आहे. ढिगाऱ्याखाली सापडल्याने कारमधून प्रवास करणारे चंदीगड येथील दोन प्रवासी जखमी झाले. त्याचवेळी हनुमान चाटी येथे डोंगरावरून दगड पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महामार्गावर दोन्ही बाजूकडे हजारो प्रवासी आणि गाड्या अडकल्याचे व्हिडिओत पहायला मिळाले.
बद्रीनाथ महामार्गावरील हेलांग येथील डोंगरावरून दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. यानंतर स्थानिक प्रशासनाने बद्रीनाथसह चारधाम यात्रा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. महामार्गावर कोसळलेल्या दरडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंगावर शहारे आणणारा भयावह व्हिडिओ आहे. पोलिसांनी गौचर, कर्णप्रयाग आणि लंगासूमध्ये बद्रीनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगितले आहे.
एसपी चमोली प्रमेंद्र डोवाल यांनी सांगितले की, वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रस्त्यावरील ढिगारा हटवण्यासाठी दोन जेसीबी मशिन वापरण्यात येत आहेत. यात्रेकरूंनी प्रवासाचे अपडेट मिळताच प्रवासाला सुरुवात करावी, असे आवाहनही केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्ग ठप्प झाल्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. या संदर्भात प्रशासनाकडून माहिती जारी करण्यात आली आहे. कर्णप्रयागचे अधिकारी अमित कुमार यांनी सांगितले की, हेलांगमधील बद्रीनाथ रस्ता सुरू झाल्यानंतर प्रवाशांना जाण्याची परवानगी दिली जाईल. तोपर्यंत कोणालाही या महामार्गावरून प्रवास करण्याची परवानगी नसेल, सुरक्षेच्या कारणांमुळे वाहतूक पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेले आहे.
दरड कोसळल्याचा व्हिडिओ भयावह आहे. व्हिडिओमधील दृश्य अंगावर शहारे आणणारे आहेत. यात घटनास्थळी लोकांच्या ओरडण्याचा आवाजही ऐकू येत आहे. लोक इकडून तिकडे सैरावैरा धावताना दिसत आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी काही प्रवाशांची वाहनेही दिसत आहेत.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मोठी दुर्घटना टळली आहे. बद्रीनाथ महामार्गाच्या ठिकाणी अडकलेल्या एका भाविकांनी सांगितले की, भगवान बद्रीनाथांची भक्तांवर कृपा झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. दरड ज्या प्रकारे कोसळली. त्यामुळे मोठी हानी होऊ शकत होती, पण दुर्घटना टळली आहे.