नागपूर ( NAGPUR ) : नागपूर शहर काँग्रेसमधील लाथाळ्यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर दखल घेतली आहे. कॉंग्रेसचे अधिकृत कार्यालय देवडिया भवनमध्ये न येणाऱ्या कार्यकर्त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीचे तिकीट मिळणार नाही, असा इशारा पटोले यांना द्यावा लागला आहे. गुरुवारी देवडिया भवन येथे पार पडलेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनुपस्थित पदाधिकाऱ्यांबद्धल विचारणा केली. बैठकांना दांड्या मारणाऱ्या आणि देवडिया भवनमध्ये जाणीवपूर्वक येण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचा अहवाल पाठवण्याचे निर्देश त्यांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांना दिले आहेत.
या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी पटोलेंकडे अनेक तक्रारी केल्या.
देवडिया काँग्रेस भवनात होणाऱ्या शहर काँग्रेसच्या बैठकांचे निमंत्रण विशिष्ट गटाच्या पदाधिकाऱ्यांनाच दिले जाते. काही पदाधिकारी येऊ नये, अशीच व्यवस्था येथे तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांऐवजी जे बैठकांना बोलावत नाही, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी असंतुष्ट गटाकडून करण्यात आली. गुरुवारी आयोजित बैठकीत माजी पालकमंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे व या नेत्यांचे समर्थक अनुपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आम्हाला बैठकीसाठी बोलावले जात नसल्याच्या तक्रारी आम्हीच प्रदेशाध्यक्षांकडे केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.