भुवनेश्वर : देशाच्या राष्ट्रपतींना सर्वाधिक सुरक्षा प्रदान केली जाते. त्यासाठी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सर्वोच्च स्तरावरील काळजी घेतली (President’s Security lapses) जाते. मात्र, ओडिशातील एका विद्यापीठात राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शनिवारी वेगळाच प्रकार घडला व त्यापायी त्यांच्या सुरक्षा रक्षकांची मोठी तारांबळ उडाली. ओडिशातील महाराजा श्रीराम चंद्र भांजादेव विद्यापीठातील दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या. अचानक कार्यक्रमस्थळावरील वीज गेली. त्यामुळे राष्ट्रपतींच्या सुरक्षा व्यवस्थेतील अधिकाऱ्यांची यापायी अक्षरशः तारांबळ उडाली. ओडिशा सरकारसाठी ही घटना अत्यंत लाजीरवाणी ठरली.
दीक्षांत समारंभात ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांचे भाषण सुरु असतानाच ऑडिटोरियममधील वीज केली. संपूर्ण ऑडिटोरिअममध्ये काळोख पसरला. राष्ट्रपतींचे सुरक्षा अधिकारी सतर्क झाले. त्यांनी धावपळ सुरु केली. तब्बल दहा मिनिटे येथील वीज गायब होती. त्यामुळे पोडिअमच्या मंद प्रकाशात राष्ट्रपतींनी भाषण केले. या प्रकारच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेसाठी बॅकप म्हणून जनरेटरची व्यवस्था देखील करण्यात आली होती. मात्र, वीज गेल्यावर जनरेटरचे स्वीच काम करीत नसल्याचे लक्षात आले.