रत्नागिरी, 7 मे,: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीत काल (दि. ६ मे) जाहीर सभेत रिफायनरी प्रकल्पाबाबत संदिग्ध भूमिका घेतल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल मैदानात श्री. ठाकरे यांची सभा झाली. बारसू (ता. राजापूर) येथील रिफायनरीला अनुकूल वक्तव्य श्री. ठाकरे यांनी यापूर्वी केले होते. मात्र कालच्या सभेत त्यांनी जमिनी विकू नयेत, असा सल्ला प्रकल्पग्रस्तांना दिला. मात्र आता जमिनी विकल्या गेल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी काय करावे, याबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही. ते म्हणाले, रिफायनरी प्रकल्प बारसूला होणार की अन्यत्र यातच सर्व मश्गूल आहेत. मात्र प्रकल्प जाहीर होण्याआधीच कवडीमोल भावाने आपल्या जमिनी विकत घेतल्या जातात. त्यानंतर प्रकल्प जाहीर होतो. राजकीय नेत्यांचे दलाल जमिनी विकतात, हे तुम्हाला कळत नाही का? आपल्या कोकणात जे आहे तेच गोवा, केरळमध्ये आहे. तेथे हे प्रकल्प कधी जात नाहीत. आम्ही मात्र दलालांना जमिनी विकून आपल्या भागात असे प्रकल्प लादून घेतो. आपण कोकणाकडे, कोकणातील क्षमतांकडे कधी लक्ष देणार, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. ते पुढे म्हणाले, बारसूमध्ये कातळशिल्पे सापडली आहेत. युनेस्कोचे जगभरातील १९२ देशांबरोबर करार आहेत. त्यात भारताचादेखील समावेश आहे. युनेस्कोअंतर्गत अंजिठा, वेरूळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स अशा अनेक वास्तू आहेत, या वास्तू युनेस्कोच्या अखत्यारीत येतात. या वास्तूंच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची विकासकामे होणार की नाही, हे युनेस्को ठरविते. जेथे या प्रकारच्या हजारो वर्षे जुन्या वास्तू असतात, त्याच्या आजू-बाजूला विकासकामे करता येत नाहीत. त्यामुळे बारसूमध्ये रिफायनरी होऊ शकणार नाही.
ठाकरे म्हणाले, मी मुंबईतील शिवस्मारकाला विरोध करतो आहे, असा आरोप करणाऱ्या शरद पवार यांनी आजवरच्या एकही भाषणात कधीच शिवछत्रपतींचा नाव घेतले नाही. आजवरची सर्व भाषणे काढून बघा. शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव ते घेतात. ही नावे घेतलीच पाहिजेत. पण शिवछत्रपतींचे नाव ते का घेत नाहीत, याचे उत्तर ते महाराष्ट्राला देणार की नाही? शरद पवार यांचा राजीनामा तसेच अन्य विषयांवरून त्यांनी विरोधकांवर टीका केली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कोकणातील २००७ पासून रखडलेल्या कामावरही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, मी गेल्या वेळी कोकणात आलो, तेव्हा मी रस्त्याची स्थिती पाहून देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. तेव्हा ते म्हणाले नितीनजींना फोन लावला तर बरं होईल. त्यांना फोन लावला, तेव्हा मला गडकरींनी सांगितले की ठेकेदार पळून गेले. कोकणातल्या माणसाला गृहीत धरले जाते, फक्त मतांसाठी वापर केला जातो. ही स्थिती बदलण्यासाठी सर्वांनी कणखर बनायला हवे. बदल घडवायला हवा, असेही ते म्हणाले.