

पोलिसांनी उधळून लावला घातपाताचा कट जम्मू, 07 मे (हिं.स.) : जम्मू-काश्मिरात होऊ घातलेल्या जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मिरातील पुलवामा येथे शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी 6 किलो आयईडीसह एका दहशतवाद्याला अटक केलीय. इश्फाक अहमद वानी असे या दहशतवाद्याचे नाव आहे. यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथे एका दहशतवाद्याला 6 किलो इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईससह (आयईडी) अटक करण्यात आली आहे. त्यामुळे घातपाताचा मोठा कट उधळून लावल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी अरिगाम भागातून इश्फाक अहमद वानी याला 6 किलो पूर्वनिर्मित आयईडीसह अटक केली. राज्यात होणाऱ्या जी-20 बैठकीपूर्वी सुरक्षा दलांच्या वाहनांवर हल्ला करण्यासाठी या आयईडीचा वापर केला जाणार होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.