नागपूर : मे महिना म्हटलं की विदर्भातील सर्वत्र रणरणतं उन्ह आणि घरोघरी कुलर असेच काहीसे चित्र सर्वत्र दिसून येते. आता दोन तीन दिवसात तापमान वाढीला लागले आहे. मात्र, यंदा निसर्ग चित्र फिरलं आणि विदर्भात अवकाळी पावसाने सुरुवात केली. त्यामुळे कुलरच्या विक्रीत प्रचंड घट झाली असल्याची माहिती कुलर विक्रेत्यांनी दिली. ज्या भावात कुलर आलेत त्या भावात कसेही करून विकायचे असे सध्या व्यवसाय सुरू असल्याचं कुलर विक्रेत्यांनी सांगितलं.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा व्यवसाय अत्यंत कमी झाला असल्याचे सुद्धा कुलर विक्रेते हे सांगत आहेत. अवकाळी पावसामुळे कुलरच्या किमती सुद्धा कमी झाल्या आहेत. मात्र, ग्राहक हे एका महिन्याकरिता कुलर का घेणार ? असा विचार करत असल्याने कुलरची विक्री पाहिजे तशी झाली नसल्याचं कुलर विक्रेत्यांनी सांगितले.