मुंबई : २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या शपथविधीबाबत एक गौप्यस्फोट केलाय. “ते एक राजकीय ऑपरेशन होते, गनिमी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता..” असा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला (Senior BJP Leader Sudhir Mungantiwar) आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मुनगंटीवार यांनी त्या प्रसंगावर भाष्य केले. मुनगंटीवार म्हणाले, “भाजपशी युती करून निवडून आल्यावर उद्धव ठाकरेंच्या ज्या प्रकारे वागले, त्यांना धडा शिकविण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन आम्ही घेतले आणि पहाटेचा शपथविधी झाला.” दरम्यान, शिंदे गटाने या मुद्यावर बोलताना मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
शिवसैनिकांचा अवमान
“भाजपची साथ सोडताना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचा अवमान तर केलाच, पण तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांचाही अवमान होता. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसविण्याऐवजी ते स्वतःच मुख्यमंत्री झाले होते. या परिस्थितीत अजित छपवार सोबत येण्यास तयार झाल्याने संपूर्ण राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, असे समजूनच तो शपथविधी झाला होता. त्यावेळी कोणतीही अट नव्हती आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होणार होते. राजकारणात परिस्थितीनुरुप म्हणून काही तात्कालिक निर्णय घ्यावे लागतात. अजित पवार भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा मिडियात दिसते. शरद पवारांनीही उद्या पाठिंबा दिला, तर तो घेणार नाही असे आम्हाला कसे म्हणता येईल?”, असे मुनगंटीवार म्हणाले.