-पुरुषोत्तम आवारे पाटील
अकोला शहर संवेदनशील असले तरी गेल्या दोन दशकात या शहराने कूस पालटून शांततेचा मार्ग स्वीकारला होता असे दिसत असतानाच परवा शनिवारी घडलेल्या घटनेतून हे शहर कसे बारुदच्या ढिगाऱ्यावर बसलेले आहे याचा प्रत्यय आला. जाळपोळ,हाणामारी,दगडफेक आणि रस्त्यात जो दिसेल त्याला जायबंदी करण्याचा जो उपद्रव झाला त्यात या घटनेशी काहीही संबंध नसणाऱ्या एका निरपराध तरुणाचा बळी गेला. जातीय दंगलीत नेहमी बळी सामान्य माणसाचा जातो हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. उपद्रव,दंगल घडवून आणणारे सावध असतात ,ते बरोबर मार्ग काढून पळून जातात आणि सामान्य निरपराध व्यक्ती या जाळ्यात अडकत असतो. परवाच्या या धुडघूसामुळे अकोला शहरात कायदा सुवस्था आणि सामाजिक सौहार्दाचे जे धिंडवडे निघाले आहेत त्याला समाजकंटक,धार्मिक द्वेषाची शेती करणारे जेवढे जबाबदार आहेत तेवढीच जबाबदार अकोल्याची पोलीस यंत्रणा आहे.
सोशल मीडियावर बेजाबदार लोकांची संख्या वाढली आहे. कुण्यातरी अतिउत्साही तरुणाने प्रेषित मोहंमद यांचा अनादर करणारा मजकूर सोशल मीडियावर टाकल्याने या वादाला सुरुवात झाली. अशावेळी पोलिसांचा सायबर सेल काय करीत होता ? हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील कट्टर लोकांच्या सोशल मीडिया खात्यांवर नजर ठेवणे हे सायबर सेलचे काम असेल तर एवढे सगळे होताना सायबर सेलने झोपा काढणे कितपत योग्य आहे ? आपल्या धार्मिक प्रेरणांचा अवमान कुणालाही सहन होत नाही मात्र कायदा हातात घेत त्याचा निषेध करण्याची ही पद्धत योग्य नाही. साधी तक्रार करायला हजार लोकांचा जमाव पोलीस ठाण्यात जात असेल तर या तरुणांची माथी भडकावून त्यांना तिथे येण्यास बाध्य करणाऱ्या उपट सुम्भ लोकांचा तात्काळ बंदोबस्त करायला हवा असे पोलिसांना का वाटले नाही. कुणाची तरी फिर्याद देण्यासाठी धार्मिक भावना खवळलेला हजारांचा जमाव पोलीस ठाण्यावर येत असेल तर त्याची काळजी रामदास पेठ पोलिसांना का घ्यावीशी वाटली नाही ?
रामदास पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद देताना लीडरकी करायला गेलेल्या नेत्यांना या तरुणांना समजावून सांगणे का आवश्यक वाटले नाही? चारशे ते पाचशे दुचाकी वरून आलेला जमाव शहरात काहीतरी हैदोस माजवेल याचा अदमास वेळीच पोलिसांना आला असता तर पुढचा सगळं उपद्रव रोखू शकला असता. मुस्लिम धर्मात गेल्या काही वर्षात निर्माण झालेले विविध पंथ आणि त्यातील कट्टर प्रचारक यांनी तरुणांची माथी भडकविण्याचे काम केले याची माहिती पोलिसांच्या खुपीया विभागाला का झाली नाही ? मुस्लिम तरुणातील वाढती व्यसनाधीनता आणि त्यातून निर्माण होणारा उन्माद यावर मुस्लिम नेत्यांना चिंतन करावेसे वाटत नसेल तर अकोल्याचे भविष्य कोणत्याही ज्योतिष्याला विचारण्याची गरज नाही. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास शेकडो वाहनांचा ताफा घोषणा देत प्रमुख मार्गावरून आणि चार पोलीस ठाण्यांचा हद्दीतून जातो आणि पोलिसांना त्याची काहीही दखल घ्यावीशी वाटत नाही हे मोठे नवल आहे.
ज्या राजेश्वर मंदिरावर दगडफेक झाली ते मंदिर जुने शहर पोलीस ठाण्याच्या समोर असताना कोणत्याही बंदूकधारी पोलिसाला किमान हवेत गोळीबार करण्याची सुबुद्धी सुचत नसेल आणि जमावाच्या भीतीने पोलीस काढता पाय घेत असतील तर अकोल्यातील पोलीस यंत्रणेला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शहरात दंगल ठिकाणे आणि दंगल वातावरण तयार करणारे कोण लोक आहेत याची माहिती पोलिसांना असते असे असतानाही जर या समाज कंटकांची ” ओरायलिंग ” केली जात नसेल तर पोलीस नेमकी कशाची वाट बघत आहेत ? राज्याचे गृहमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मात्र गेली अनेक वर्ष अकोल्याचे पोलीस आयुक्तालय साकारत नाही. जिल्ह्यातील एसआरपी आणि सीआरपी बटालियन कोणतेही कारण नसताना नागपूर जिल्ह्यात काटोल येथे हलवली जाते तरीही त्यावर इथले नेतृत्व चकार शब्द काढत नसेल तर अकोलेकरांची त्यांना किती काळजी आहे हे दिसून येते.तत्कालीन आमदार तुकाराम बिडकर यांनी या बटालियन वर विधानसभेत आवाज उठवला होता.
नवीन पोलीस अधीक्षक सर्वांची मर्जी सांभाळणारे असल्याने त्यांचा धाक शहराला वाटत नाही. शहराला असणारे डीवायएसपी किंवा ऍडिशनल एसपी यांचाही समाजकंटक किंवा गुन्हेगारांना धाक वाटत नाही. शहरातील ठाणेदार असे बसवले आहेत की त्यांना त्यांचे मूळ काम सोडून सगळेच जमते असा मामला असणाऱ्या अकोला शहराचा सध्या कुणी वाली आहे असे म्हणायचे धाडस कुणी करणार नाही. या शहराला आगामी काळात सर्वच प्रकारच्या उपद्र्वपासून दूर ठेवायचे असेल तर मंजूर पोलीस आयुक्तालय या निमित्याने सुरु व्हायला हवे. किमान तीनचार आयपीएस जेव्हा या शहराला मिळतील तेव्हा हे शहर आणि शांततेला नख लावणाऱ्या प्रवृत्ती सुतासारख्या सरळ होतील. अन्यथा अशा जातीय भडक्यात आणखी कुण्यातरी विलास गायकवाडची आहुती जाईल. शहर द्वेषाच्या दारुगोळ्यावर ज्यांनी नेवून ठेवले त्यांना या मशागतीतून विखाराचे पीक घ्यायचे आहे हे करताना दोन्ही कडील निष्पाप लोकांचे बळी सुद्धा त्यांना घ्यायचे आहेत.
पोलीस खात्यातील सायबर सेल,खुपीया विभाग आणि खबऱ्यांचे जाळे या निमित्याने नव्याने निर्माण करून त्यांना मजबुती देण्याची गरज आहे. परवाच्या उन्मादाच्या मुळाशी कुणाचे नेतृत्व नसले तरी धार्मिक प्रतीकांच्या आडून तरुणाची माथी भडकविणे हाच ज्यांचा धंदा आहे अश्या लोकांवर आगामी काळात विशेष नजर ठेवायला हवी. शहरातील प्रमुख मार्गावरून शेकडो गाड्यांचा ताफा घोषणा देत जात असताना सीसीटीव्ही मधील फुटेज तपासून कारवाई करता येणे शक्य असताना ज्यांचा संबंध नाही अश्या तरुणांना घरातून का उचलले जात आहे हे कळत नाही. पोळाचौक ,हरिहर पेठ जयहिंद चौक येथील सीसी कॅमेरे सुरु आहेत का ? असतील तर या माथेफिरू तरुणाच्या शिवाय इतर कुणीही रस्त्यावर आलेले त्यात दिसत नसेल तर दोन्ही बाजूंच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याचा फार्स आगामी काळात होऊ नये याचीही काळजी पोलीस यंत्रणेने घ्यायला हवी.