बीड : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या व महाप्रबोधन यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या सुषमा अंधारे या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत असल्याने त्यांना दोन थप्पड मारल्याचा दावा ठाकरे गटाचे बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी (Sushma Andhare Slapped) केला आहे. तर दुसरीकडे अशी कुठलीही घटना घडलेली नसून मला मारहाण झालेली नाही, असा दावा अंधारे यांनी केला आहे. त्यामुळे हे नेमके काय प्रकरण आहे, याबाबत गोंधळाची स्थिती आहे. थप्पड मारल्याचा दावा करणारा जाधव यांचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या घटनेनंतर जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बीडच्या संपर्कप्रमुखांवरही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सध्या सुषमा अंधारे या ठाकरे गटाकडून सुरु असलेल्या महाप्रबोधन यात्रेचे नेतृत्व करीत आहेत. सध्या त्या बीडमध्ये आहेत. ठाकरे गटाच्या बीडमधील जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुषमा अंधारे या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यापायी आमच्यात झालेल्या भांडणात आपण सुषमा अंधारे यांना दोन चापटा लगावला, असा दावा जाधव यांनी जाहीरपणे केलाय. जाधव यांचा हा दावा सुषमा अंधारे यांनी फेटाळला असला तरी या प्रकाराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, जाधव यांच्या हकालपट्टीचे आदेश देण्यात आले असून संपर्कप्रमुखांवरही कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता जाधव काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलेले आहे.
काय म्हणतात जाधव?
जाधव यांनी सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट करून या घटनेची माहिती दिली आहे. जाधव म्हणाले की, मी सुषमा अंधारे यांच्या दोन चापटा मारल्या आहेत. त्या कार्यकर्त्यांकडून पैसे मागत आहेत. माझे पद विक्री करायला त्या निघाल्या आहेत. अनेक दिवसांपासून त्या कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करून विविध वस्तु मागत आहेत. त्यांच्या परळीतील कार्यालयासाठी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना ऐपत नसतानाही वस्तु दिल्या. आम्ही नकार दिल्याने आमच्याबद्धल निगेटीव्ह गोष्टी त्या पसरवित होत्या. यासंदर्भात आपण स्वतः उद्धव साहेबांना भेटलो व तक्रारी देखील केल्या. मात्र, तरीही हा प्रकार सुरुच होता. आज मी त्यांना जाब विचारायला गेलो असता बाचाबाची होऊन हा प्रकार घडल्याचे जाधव यांनी सांगितले. उद्या शनिवारी बीडमध्ये यात्रेची ग्रामीण महाराष्ट्राची समारोपाची सभा असून त्यात संजय राऊत यांची उपस्थिती राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात हा गोंधळ निर्माण झालाय.
असा प्रकारच घडलेला नाही
दरम्यान, असा प्रकारच घडलेला नसून हा शिंदे गटा प्लॅन दिसतो, असा दावा सुषमा अंधार यांनी केलाय. मला मारहाण झाली असती, तर ते जिवंत परत गेले असते का? मी आता महाप्रबोधन यात्रेवर फोकस करत आहे, असा दावाही त्यांनी केला.