मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे हे (Former NCB Director Sameer Wankhede) चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एनसीबीने दाखल केलेल्या शपथपत्रात वानखेडे यांच्याबाबत धक्कादायक माहिती मांडण्यात आली आहे. वानखेडे कुटुंबियांनी २०१७ ते २०२१ या कालावधित सहा परदेशदौरे केले असून त्यात इंग्लंड, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदिव या देशांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तब्बल ५५ दिवसांपेक्षा अधिक काळ ते परदेशात होते मात्र यासाठी त्यांना केवळ ८.७५ लाख रुपयांचा खर्च आल्याचा दावा वानखेडे यांच्याकडून करण्यात आलाय. या खर्चात त्यांच्या विमान प्रवासाचा खर्चही निघत नाही, असा निष्कर्ष चौकशी अहवालातून काढण्यात आलाय.
एनसीबीचे वरीष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वातील विशेष चौकशी समितीने २०२१ मध्ये वानखेडे यांची चौकशी केली होती. त्या चौकशी अहवालातून ही धक्कादायक माहिती मांडण्यात आली आहे. २०२१ मध्ये समीर वानखेडे आणि त्यांचा मित्र विरल राजन कुटुंबीयांसोबत मालदीव ट्रिपला गेले होते. ते मालदीवच्या ताज एक्झॉटिका रिसॉर्टमध्ये वास्तव्याला होते. येथे वानखेडे कुटुंबीयांनी साडेसात लाख रुपये भरले होते. वानखेडे यांनी चौकशी सुरु झाल्यावर विरल राजन यांच्या क्रेडिट कार्डवरून रिसॉर्टचे उरलेले पैसे भरले होते, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली होती.