
21 एप्रिल 2023. एक आनंददायी सकाळ संध्याताई बेडवरच बसून होत्या. किरणापूरहून एक कॉल आला. ” मॅडम, आम्ही येतोय घरी सायंकाळी भेटायला. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”
15 ते 20 वर्षांपूर्वीचा काळ. ती शिक्षिका होती किरणापूरच्या जिल्हा परिषद शाळेत. अख्ख्या गावची ही संध्यामॅडम सर्वांचं दुखणं खुपणं सावरायची. कुणाचा नवरा दारु पिऊन धिंगाणा घालायचा तर कुणातरी स्त्रीला नवरा शुल्लक कारणावरुन मारायचा. अशावेळी या स्त्रीया आपलं दुखणं घेऊन ताईकडे यायच्या. ताई त्यांच्या समस्येवर तोडगा काढायच्या. येताना समस्या घेऊन येणारा व्यक्ती समाधान घेऊनच जात असे. म्हातान्या कोताऱ्यांना वाटायचं की डॉक्टर पदवी असल्यामुळे मॅडम औषध देणारी डॉक्टर आहे. म्हणून कधीतरी गोळया घ्यायलाही शाळेत कुणीतरी यायचं. पण खऱ्या अर्थाने ती आहे मनाची डॉक्टर विचार करायला शिकवणारी व माणसातलं माणूसपण शोधणारी एक चिकित्सक अख्खं गाव ताईचं म्हणणं ऐकू लागलं अन् संपूर्ण गावातून व्यसनं हद्दपार झाली. आजही कुणाला मदतीची गरज पडली की येतात ताईकडे. संध्याताईचा सल्ला त्यांचेसाठी फार मोलाचा असतो.

आता किरणापूरची शाळा बंद झालीय. कायमची. पण तेव्हाचे वेळी चौथ्या इयत्तेत शिकणारा हा मुलांचा समूह 21 एप्रिलला मॅडमचा जन्मदिवस लक्षात राहावा म्हणून ही मुलं धडपड करायची. कुणी जन्मदिवस वहीत लिहून ठेवला तर कुणी घरातील भिंतीवर लिहून ठेवला. एका मुलाने तर चक्क शाळेत असलेल्या गुलमोहराच्या झाडावर चढून तो उंच भागी खोडावर कोरुन ठेवलेला. हीच सर्व मुलं आज येणार होती सायंकाळी आपल्या लाडक्या मॅडमचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी.
13 फेब्रुवारी 2023. संध्याताई पुण्याला आपली मानसकन्या माधुरीकडे मुक्कामाला होती. निमित्त्य होतं एका लग्नाचं. दुपारची वेळ. माधुरी गाडी चालवत होती. ताई मागे बसलेल्या अचानक एका वळणावर चारचाकीने धडक दिली. ताईचा मोठा अपघात झाला. ताईचा जीव वाचला पण शरीराला मोठी दुखापत झाली. नाना तऱ्हेचे उपचार, ऑपरेशन्स व औषधोपचार अजूनही सुरु आहेत. तेव्हापासून त्या बेडवर खिळून आहेत. आजही पूर्वीपासून असलेला टिनिटसचा तीव्र त्रास आणि त्यात भर पडली ती या अपघाताची. अपघाताच्या पहिल्या दिवसापासून आजतागायत मी सतत ताईच्या संपर्कात आहे. शरीर जायबंदी झालंय ताईचं पण मन मात्र सशक्त आहे. अंगात दुखणं भरलेलं पण चेहेरा मात्र टवटवीत. अशाही अवस्थेत त्यांच्या चेहेऱ्याकडे बघितलं की आपलं दुखणं आपण क्षणभर विसरुन जातो. कुठून येत असेल एवढं सामर्थ्य ? मलातरी हे न सुटलेलं एक कोडं आहे.
1997 पासून माझा संध्याताईंशी संपर्क आहे. त्यांचा स्वभाव नेहमीच असा आहे. आल्हाददायी व प्रेरणादायी. संध्याताईंची प्रत्येक कृती ही अर्थपूर्ण असते असे मला फार सवयीने जाणवले. त्यांचे ठायी असलेला परोपकारी भाव व सच्चेपणा मनाला स्पष्टपणे जाणवतो. त्यांच्यात असलेला निर्मोही व साधेपणात नटलेला स्वभाव अंतर्मनाला भुरळ घालतो. कितीतरी वर्षांपासून त्या निराधार मुलींचे संगोपन करताहेत ते फक्त स्वतःची पदरमोड करुन. मुलींचे शिक्षण असो, लग्न असो वा त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं असो; हे सर्व ताईंनी केलंय केवळ एक व्रत म्हणून. कुठलीही अपेक्षा न करता केवळ एका मातृत्वाच्या भावनेतून. आई आपल्या स्वतःच्या पिलांसाठी कष्ट करते हे खरंय; पण ही आई मात्र स्वतःच्या पिलांचा घासही इतरांच्या पिलांना देऊन तृप्त होते. मला समजायला लागल्यापासून मी अशी आई कधीही कुठे पाहिलेली नाही. मी स्वतः एका निराधार मुलीला ताईकडे ठेवलं होतं. त्या मुलीमुळे संध्याताईंना बरेचदा त्रास सहन करावा