
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील कोणाला काय करायचे तो त्यांचा अधिकार आहे.आम्ही कशाला नाक खुपसायचे, कुणाला मंत्री करायचे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठरवतील. धुसफूस वाढावी म्हणून ही मंत्र्यांना हटविणार अशी विरोधकांनी गाजराची पुंगी सोडली आहे असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मंत्रिमंडळ विस्तार आणि कुणाला संधी, कुणाला काढणार यासंदर्भात ते बोलत होते. आळंदीच्या घटनेसंदर्भात राजकारण करू नका,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असले तरी विरोधक यावरून राजकारण करीत आहेत.महाविकास आघाडीचे सरकार असताना यापेक्षा मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेची पुनरावृत्ती नको म्हणून काही व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रवादीत काही लोकांना नवीन जवाबदारी दिल्यानं उत्साह आहे त्यामुळे ते आरोप करीत आहेत अशी नाव न घेता सुप्रियां सुळे यांच्यावर बावनकुळे यांनी टीका केली. मी भाजपचा 32 वर्षापासून कार्यकर्ता आहे, मला नाही वाटत कोणाच्या अधिकारात भाजप हस्तक्षेप करेल, आमची युती आहे. दरम्यान, काल रामटेक येथील कार्यक्रमात माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सेना खासदार,आमदार विरोधात नाराजी व्यक्त केली याबाबत बोलताना भाजपचे उमेदवार असलेले रेड्डी यांचा पराभव केला, पण ज्यांच्यामुळे पराभव झाला त्यांनी मंचावर येऊ नये असे वाटत असले तरी शिंदे आणि भाजपची युती आहे, त्यामूळे सेनेचे आशिष जयस्वाल हे आमच्या मंचावर आले होते. रेड्डी यांनी काल कृती केली ती चुकीची होती, निवडणूक झाल्यानंतर सर्वांनी जूने हेवेदावे विसरून विकासाचे राजकारण करायचे असते अशी रेड्डी यांची चूक कबूल केली.
भविष्यात कोणत्याही मतदार संघाचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार हे केंद्रीय पार्लमेंटरी कमिटीला आहेत. कुणी उत्साहाच्या ओघात काही बोलले तरी त्याला तथ्य नाही… या सदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच उमेदवार ठरतील असेही ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे लोकांचा विश्वास आमच्यावर आहे, 2024 मध्ये राज्यात आमच्या 200 जागा निवडून येतील.
दरम्यान, काहीही बोलण्यापेक्षा हसन मुश्रीफ यांनी इतिहास पाहावा.राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर पडले तेव्हा- तेव्हा जातीय असंतोष घडला आहे. चिथावणीखोर ट्विट केले नसते तर कोल्हापूरची घटना घडली नसती.
सत्तेतून बाहेर पडल्यावर ओबीसी, शेतकरी दिसतो, सत्तेत असले की उद्योगपती दिसतात, विरोधात जाताच मुस्लिम आणि इतर समाज आपल्या बाजूने राहावे यासाठी अशा घटना घडत असतात असा आरोप बावनकुळे यांनी केला.
