
जळगाव, 16 जून ; देशात विविध राज्यांच्या निवडणुकीमुळे देशातील चित्र बदलत असल्याने आणि सत्ताधाऱ्यांना मतदार जागा दाखवीत असल्याने भाजप किंवा नरेंद्र मोदी हे एकत्रितपणे विधानसभा आणि लोकसभा निवडणूक घेणार नाहीत, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमळनेर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मांडले.
राष्ट्रवादीच्या ग्रंथालय विभागाचे आज १६ जून रोजी अमळनेर येथे अधिवेशनाच्या पहिल्या सत्रानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थित होते.

पवार म्हणाले कि, दिग्विजयसिंग यांनी ईव्हीएमद्वारे निकाल बदलले जाऊ शकतात, असे सिद्ध केले आहे आणि म्हणूनच निवडणुकीची जुनी पद्धत असावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकरी मालाला कपाशीला भाव नाही. यावर त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, अशी घोषणा सरकारने केली मात्र सरकार कमी भाव देत असल्याने उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शासनाने एजन्सीमार्फत माल खरेदी करावा किंवा शेतकऱ्यांना अनुदान तरी द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.