नागपुरात कारमध्ये गुदमरून तिघा चिमुकल्यांचा दुदैवी मृत्यू

0
449

नागपूर- कारमध्ये गुदमरून तीन मुलांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास नागपुरात उघडकीस आली. शहरातील फारूखनगर परिसरातील ही घटना असून विशेष म्हणजे शनिवारी दुपारपासून तिन्ही मुले बेपत्ता होती व त्यांच्या बेपत्ता होण्याची पोलिस तक्रार देण्यात आली होती. काल तिघांचे मृतदेह कारमध्ये आढळून आले. ही मुले वय वर्षे ४ ते ६ या वयोगटातील होती. (The bodies of the missing children found inside an old car) हा अपघात आहे की घातपात या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे. तौफीक फिरोज खान ( वय 4), आलिया फिरोज खान ( वय 6) आणि आफरीन इर्शाद खान (वय 6) अशी या मुलांची नावे आहेत.

 

शनिवारी दुपारी ही मुले खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने पालकांनी पोलिसांशी संपर्क साधून अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला होता.
रविवारी सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका नादुरुस्त कारमध्ये त्या तिघांचेही मृतदेह आढळले. घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. दरम्यान, त्यांचा गुदमरून मृत्यू झाला की घातपात झाला याचा पोलिस तपास करीत आहे. या मुलांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या घरापासून ५० मीटर अंतरावर एका एसयूव्ही कारमध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, खेळत असताना मुलांनी कारचा दरवाजा आतून बंद केला. मग तो दरवाजा उघडता आला नाही. उष्णता आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. तौफिक आणि आलिया भावंडे आहेत, तर आफरीन शेजारी राहत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा