ठाकरे गटाकडील विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपद जाणार?

0
44

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील गळती सुरुच असून विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी त्यांना जय महाराष्ट्र केल्याने ठाकरे गटाकडे असलेले विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पद धोक्यात आले आहे. सध्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे परिषदेतील विरोधी पक्ष नेते पद असून ठाकरे गटाची संख्या कमी झाल्याने या पदावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडूनही दावा सांगितला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी काल रविवारी रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची सचिवपदी नियुक्ती केली असून त्यांच्याकडे प्रवक्तेपदही देण्यात आले आहे. आमदार कायंदे यांच्या पक्ष सोडण्याने विधान परिषदेतील समीकरणे बदलली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या 9 पर्यंत कमी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील 9 इतकीच आहे. विधानपरिषदेत पाच अपक्ष आमदार आहेत. त्यापैकी किशोर दराडे यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला आहे तर सत्यजीत तांबे यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे एकूण संख्याबळ 10 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ प्रत्येकी 9-9 इतके बरोबरीत राहते. दराडेंनी पाठिंबा बदलल्यास गणित बदलू शकते, असे जाणकारांना वाटते. विरोधी पक्षनेते आणि उपसभापतीपद ठाकरेंकडेच असल्यामुळे केवळ राष्ट्रवादीच नाही तर काँग्रेसकडूनही दावा होऊ शकतो. विधान परिषदेत भाजपकडे २२, तर शिंदे गटांकडे २ चे संख्याबळ आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा