अजित दादांची वेदना…

0
48

 

-पुरुषोत्तम आवारे पाटील

राष्टवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित दादा पवार यांनी चांगलीच बॅटिंग केली. आपल्या मागून आलेल्या काही प्रादेशिक पक्षांनी स्वबळावर विविध राज्यात सत्ता हस्तगत केली मात्र आपण अजूनही ते यश का प्राप्त करू शकलो नाही अशी खंत त्यांनी व्यक्त करून पक्षाचे काहीतरी चुकतेय याकडे अंगुलीनिर्देश केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर मला विरोधी पक्षनेत्यांच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्षात जबाबदारी द्या , बघा कसे सगळे सरळ करतो अशी भावना व्यक्त केली. पक्षातील अनेक आघाड्यातील पदे रिक्त आहेत ,युवक काँग्रेस मधील युवक प्रौढ झाले तरी त्याच पदांवर कायम राहतात यात कोणाचे हिट दडलेले आहे असाही सवाल त्यांनी करून सर्वाना चकित केले आहे. अजित दादा रोखठोक बोलण्यात प्रसिद्ध आहेत,त्यांना छक्केपंजे चालत नाहीत पक्षात जे काही शालेय ते निमूटपणे सहन करणे त्यांच्या स्वभावात नाही.

अजित दादांनी ज्या भावना जाहीरपणे व्यक्त केल्या त्या अनेकांच्या आहेत मात्र योग्य व्यक्तीने योग्य ठिकाणी त्या व्यक्त केल्याचे समाधान आता व्यक्त केले जात आहे. दादांचा त्रागा रास्त आहे कारण गेल्या १० वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या आम आदमी पार्टीने दिल्लीत तिसऱ्यांदा आणि पंजाबात यावेळी एकट्याच्या बळावर सत्ता काबीज केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी आणि आंध्रमध्ये तोच प्रयोग जगनमोहन रेड्डीनी केला आहे. या सगळ्यांची उदाहरणे देऊन अजित दादांनी पक्षातील दिग्गज आणि धोरण कर्त्यांना सवाल केला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस बाबत हे का घडू शकले नाही ? गेली सत्तावीस वर्ष पक्ष देशभर काम करीत आहे आणि आपापल्या जिल्ह्यात प्रभावी पकड असणारे असंख्य नेते पक्षात कार्यरत आहेत तरीही पक्षाला एकहाती यश का मिळत नाही ही दादांची चिंता सर्वाना विचारात टाकणारी म्हटली पाहिजे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत गेली अनेक वर्षे तगडे नेते काम करतात मात्र पक्षासाठी काम करताना आखडता हात घेतात असा आजवरचा अनुभव आहे. या पक्षात प्रामुख्याने सहकार क्षेत्रात काम करणारे आणि ज्यांच्या अनेक सहकारी संस्था आणि विविध शाळा,कॉलेज आहेत अश्या नेत्यांचा भरणा अधिक आहे. कोणताही सहकार नेता उघडपणे राजकीय वैर घेऊन पक्षाचे काम करीत नसतो हा आजवरचा अनुभव आहे. स्वतःच्या सहकारी संस्था कायम हातात ठेवण्यासाठी जेवढा आटापिटा केला जातो तेवढी मेहनत पक्षासाठी घेताना हे नेते दिसत नाहीत हे वास्तव आहे. वर्षानुवर्षे जुने नेते किंवा त्यांचे वारस पक्षातील महत्वाच्या पडणं वेटोळे मारून बसले आहेत त्यामुळे नव्यांना काम करण्यास अजिबात संधी नाही,कुणी नवा त्या पदावर आला तर काही महिन्यात निष्क्रिय होऊन घरी कसा बसेल याची फिल्डिंग लावण्यात हेच नेते पटाईत असतात त्यामुळे नेत्यांच्या गर्दीने या पक्षावर सूज आली आहे मात्र विजयासाठी लागणारी सुदृढता त्यांच्याकडे नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे.

आपण जणू सत्तेवर बसण्यासाठीच जन्माला आलो आहोत असा गैरसमज अगदी जिल्हा पातळीवरील नेत्यांना झाला असल्यामुळे विरोधी पक्षाचे नेमके काम काय असते याचा सगळ्यांना विसर पडला आहे. जनतेत कुठलीही प्रतिमा नसणाऱ्या केवळ मुंबईत नेत्यांच्या बॅगा उचलून नियमित नेत्यांचे मुखप्रक्षालन करणाऱ्या बाजार बुणग्यांची अनेक पदांवर भरती करण्यात आली आहे. सत्तेच्या काळात ज्यांना पक्षाने विविध कारणांनी ताकद दिली ते जमा केलेल्या धनाची विल्हेवाट लावण्यात मश्गुल आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हेच नेते सामान्य उमेदवारीसाठी पैसा खर्च करण्यात कुचराई करतात उलट उमेदवारालाच प्रचारासाठी गाडी पाठवून हे टोपणजी मतदार संघात मिरवावे लागतात अशी वाईट अवस्था या पक्षाची झालेली आहे. पक्षातील सेवादल सारखी अत्यंत महत्वाची आघाडी या कर्मदरिद्री पणामुळे बंद पडली आहे.

गावपातळीवरील कार्यकर्ते सोडा खुद्द नेत्यांना आता पक्षाकडून काहीही अपेक्षा राहिली नसल्याचे निराशाजनक वातावरण प्रत्येक जिल्ह्यात निर्माण झाले आहे. पदाधिकारी आणि जनता यांचा संपर्क तुटला आहे ,लोकांच्या प्रश्नावर आंदोलने सोडाच ,घरातून बाहेर पडावे असे अलीकडे नेत्यांना वाटत नाही. राजकारण हे पैसा उपसण्याचे माध्यम असल्याचे ज्यांना वाटते अशाना प्रदेश स्तरावरून अधिक महत्व दिले आहे त्यामुळे निम्मे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार इतरांकडे सरकला आहे. दादांनी ज्यांची उदाहरणे दिली ते आप, तृणमूल किंवा बीआरएस पक्ष संघटन वाढीसाठी कोणत्या पातळीवर परिश्रम करतात याचा नेत्यांनी अभ्यास करण्याची गरज आहे. काल ,परवा आलेल्या भारत राष्ट्र समितीने जर याच राज्यात ३० लाखांवर सभासद नोंदणी केली असेल तर पक्षाकडून आजवर मलिदा घेतलेले गब्बर नेते काय करीत आहेत याचा जाब सुद्धा दादांनी जिल्हावार दौरा करून स्थानिक नेत्यांना विचारला पाहिजे.

-पुरुषोत्तम आवारे पाटील

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा