
-राहुल गांधी
(New Dellhi)नवी दिल्ली : मणिपूरमधील हिसाचारावरून काँग्रेसने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्ला चढविला. (Rahul Gandhi on No Confidence Motion) मणिपूरचे दोन तुकडे करण्याचे सरकारचे प्रयत्न असून पंतप्रधानांच्या दृष्टीने मणिपूर हे भारतच नाही, अशी टीकाही राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केली.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला राहुल गांधी लोकसभा अध्यक्षांना म्हणाले की, सर्वात आधी मी आपले आभार मानतो. कारण मला पुन्हा लोकसभेचं सदस्यत्व बहाल केले. भाजपच्या मित्रांना घाबरण्याची गरज नाही, कारण माझे भाषण अदानींवर नाही. माझे भाषण दुसऱ्या मुद्यांवर आहे. गेल्यावर्षी मी 130 दिवस भारतातील एका टोकावरून दुसऱ्या टोकाला गेलो होतो. यात्रेदरम्यान मला लोकांनी विचारले की तू का चालत आहे. काय उद्दिष्ट आहे. सुरुवातीला माझ्याकडे उत्तर नव्हते. ही यात्रा का सुरू केली. हे कदाचित मलाही माहिती नव्हते. मला भारत समजून घ्यायचा होता. लोकांमध्ये जायचे होते. यात्रा सुरू केल्यानंतर दोन-तीन दिवसात माझ्या गुडघ्यात त्रास सुरू झाला. प्रचंड त्रास होत होता. जेव्हा माझ्यातील भीती वाढत होती. कुठूनतरी कुठली तरी शक्ती माझी मदत करत होती, असे राहुल गांधी म्हणाले. काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो होतो. आपले पंतप्रधान नाही गेले. अजूनही गेलेले नाहीत. कारण त्यांना त्यांच्यासाठी मणिपूर भारत नाहीये. मणिपूरची तुम्ही दोन भागात विभागणी केली आहे, ते तोडले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले, भारत एक आवाज आहे. त्या आवाजाची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केली. याचा अर्थ भारत मातेची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केली. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारलं. तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशभक्त नाही. तुम्ही देशप्रेमी नाही आहात, तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही भारत मातेचे रक्षक नाहीत, तुम्ही भारत मातेचे हत्यारे आहात. भारत माझी आई आहे आणि तुम्ही माझ्या आईची हत्या मणिपूरमध्ये केलीये. माझी एक आई इथे बसलीये, माझ्या दुसऱ्या आईला तुम्ही मणिपूरमध्ये मारले आहे, असाही आरोप त्यांनी केला.