
मुंबई- हनुमान चालिसा प्रकरणात खटला सुरु असताना वारंवार गैरहजर राहणाऱ्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा (Navneet Rana & Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयाने चांगलेच खडसावले. (Hanuman Chalisa Case hearing) तुम्हाला न्यायव्यवस्था म्हणजे गंमत वाटते का? असा सवाल न्यायालयाने केला आहे. दीड वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सध्या मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. मात्र, वारंवार समन्स बजावूनही राणा दाम्पत्य सुनावणीसाठी गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
गुरुवारी सुनावणी असताना राणा दाम्पत्य गैरहजर राहिले. संसदेचे अधिवेशन सुरु असल्यामुळे खासदार नवनीत राणा यांची गैरहजेरी समजू शकतो. पण, आमदार रवी राणा गैरहजर का? असा सवाल यावेळी न्यायालयाने उपस्थित केला. विशेष म्हणजे या सुनावणीवेळी राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट, सरकारी वकील सुमेर पंजवानी हेदेखील गैरहजर होते. प्रकरणाचे तपास अधिकारीही सुट्टीवर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे न्यायाधीश चांगलेच नाराज झाले. आता २८ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी आहे.