
गोंदिया -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांचे भाषण ट्विट करत या भाषणाचे कौतुक केले. यावर बोलताना विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार म्हणाले की, त्यांना आता पर्याय नाही. जे भाजपासोबत केले, ते सर्व पोपट झाले आहेत. त्यामुळे ते शिकवलेल्या पोपटासारख बोलत असतात असा टोला त्यांनी मुख्यमंत्री यांना लगावला आहे.
आमची युती ठाकरेंसोबत आहे, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं त्यावर बोलताना विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार म्हणाले की, आम्ही कुठे म्हटलं आहे की, प्रकाश आंबेडकरांची युती आमच्याबरोबर आहे. त्यांना काँग्रेस सोबत युती करायची असेल तर आमचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत. नाही घ्यायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण असा कोणताही संभ्रम प्रकाश आंबेडकर यांनी पसरवू नये असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. भारतात विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य एखाद्या पत्रकारांनी जर सत्य बाजू लिहिली असेल त्यांना धमकावून किंवा मारहाण करणे योग्य नाही. सत्तेच्या मस्तीमध्ये ज्याप्रमाणे आमदार वागत आहेत, याला जनतेने धडा शिकवायला पाहिजे, असे प्रश्न आता आम्ही जनतेपुढे मांडू अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे.
दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाने अविश्वास प्रस्तावा दरम्यान आपला व्हीप मागे घेतला. या प्रश्नावर बोलताना विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवर म्हणाले की आम्हाला सुद्धा माहित आहे की आमच्याकडे बहुमत नाही. परंतु मौनी बाबांनी मणिपूर प्रश्नावर काहीतरी बोलावे याकरिताच हा अविश्वास आणला आहे. मोदी यांनी मणिपूर प्रश्नावर बोलायला पाहिजे. महिलांवर अत्याचार झाले त्याबद्दल बोलायला पाहिजे. याकरिता हा अविश्वास आणला आहे. मुख्य म्हणजे मणिपूर येथील जागा ही कामासाठी अदानीला द्यायची आहे. त्यासाठी भाजपाने मणिपूर षडयंत्र घडवून आणले आहे, यामागे केंद्र सरकार संपूर्णपणे सहभागी आहे.