
मुंबई MUMBAI -वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी (VBA Leader Prakash Ambedkar to contest from Akola LS) महत्वाची घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक आपण अकोला मतदार संघातूनच लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आंबेडकर यांचा महाविकास आघाडीतील संभाव्य प्रवेश होणार की नाही, यावर चर्चा सुरु झाली आहे. अद्याप महाविकास आघाडीने आंबेडकरांच्या प्रयत्नांना दाद दिलेली नाही.
आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे देशाला धोकादायक झाले आहेत. त्यांना समर्थन देणाऱ्या हिंदू संघटनांनी फेरविचार केला पाहिजे. मोदींनी मणिपूरमध्ये मैतेई जातीला आदिवासींचा दर्जा का दिला? तशी मागणी होती का? हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं पाहिजे, असेही ते म्हणाले. आगामी काळात देशपातळीवर स्थापन झालेल्या इंडिया या आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या निमंत्रणाची आपल्याला प्रतीक्षा असल्याचे आंबेडकर म्हणाले. या आघाडीत एसटी, एससी, ओबीसी नाहीत. माझ्यासारखे भाजप विरोधात असणारे तुम्ही का घेत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीत माझा समावेश करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घेतलेली असून ते शब्दाचे पक्के आहेत, असेही आंबेडकर म्हणाले.
