मराठी शाळांच्‍या भल्‍यासाठी मध्‍यमवर्गीयांनी पुढे यावे – महेश एलकुंचवार

0
58

विदर्भ साहित्य संघातर्फे डॉ. रवींद्र शोभणे यांचा जाहीर सत्कार

नागपूर, 13 ऑगस्ट
आपल्या देशात शिक्षण आणि आरोग्य हे दोन क्षेत्र कायम दुर्लक्षित राहिले आहेत. दरिद्र्य रेषेखालील मुलांच्या शिक्षणाची स्थिती अत्‍यंत चिंतनीय असून मराठी शाळांची स्थिती अत्‍यंत दयनीय आहे. मराठी शाळांवर आलेली अवकळा दूर करण्यासाठी सरकारवर विसंबून न राहता मध्यमवर्गीय लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांनी केले. डॉ. रवींद्र शोभणे यांची मराठी शाळांची स्थिती सुधारण्‍यासाठी चाललेली धडपड उल्‍लेखनीय असल्‍याचे सांगत त्‍यांनी डॉ. शोभणे यांना त्‍यांच्‍या भविष्‍यातील कार्यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या.
प्रसिध्द साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांची अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानिमित्ताने रविवारी विदर्भ साहित्य संघातर्फे त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. विदर्भ साहित्य संघाच्‍या च्या अमेय दालनात झालेल्‍या या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते तर सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यावेळी डॉ. रवींद्र शोभणे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. डॉ. शोभणे यांच्या पत्नी अरुणा शोभणे यांचा सत्कार रंजना दाते यांनी सत्‍कार केला.
डॉ. शोभणे मराठी शाळांच्‍या अवस्‍थेचा गांभियाने विचार करीत आहेत. पण जोपर्यंत या तळमळीचे लोकचळवळीत रूपांतर होणार नाही तोपर्यंत मराठी शाळांची स्‍थ‍िती सुधारणार नाही, असे महेश एलकुंचवार म्‍हणाले.
डॉ. शोभणे यांच्यामध्‍ये विनय आणि ऋजुता हे गुण असल्याचे पद्मश्री डॉ. अभय बंग म्‍हणाले. आजचा समाज कसा आहे याचे दर्शन साहित्यिक घडवू शकतो तर त्या समाजाचे मार्गदर्शन हा सामाजिक कार्यकता करू शकतो. असे झाल्यास शेतकरी आत्महत्या, शिक्षणाची परिस्थिती, पर्यावरणाची हानी यावर प्रभावीपणे लक्ष वेधता येईल. डॉ. शोभणे यांनी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्र आणून समाजाला दिशा देण्याचे काम करावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. साहित्यिक व्यक्तीने केवळ भूतकाळ आणि वर्तमान यावर भाष्य न करता भविष्याचा वेध घेणारे साहित्य निर्माण करावे, असेही ते यावेळी म्‍हणाले.
डॉ. शोभणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सत्‍काराचा हा क्षण अतिशय आनंद, अभिमान आणि जबाबदारीचा जाणीव करून देणारा असल्याचे संगीतले. आपल्या गावाची,कुटुंबियांची पार्श्वभूमी सांगून चांगले शिक्षक लाभल्याने वाचनाची आणि लिखाणाची गोडी लागल्याचे ते म्हणाले. समाज सध्या मूल्यहीनतेकडे जात असल्‍याबद्दल खंत व्यक्त करून डॉ. शोभणे म्‍हणाले, आपण मराठी शाळा, दर्जेदार शिक्षण, शालेय व्यवस्थापन आणि शिक्षक भर्ती इत्यादीमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप यावरही विचार होणे गरजेचे असल्‍याचे ते म्‍हणाले. या क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन करण्यासाठी पावले उचलण्यावर त्यांनी भर दिला.
सामाजिक भान असलेले लेखन शोभणे करतात असे गौरवउद्गार काढून त्यांची नियुक्ती ही गौरवची बाब असल्याचे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी अध्‍यक्षीय भाषणात सांगितले.
डॉ. राजेंद्र डोळके यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ. रवींद्र शोभणे यांचे अभिनंदन आणि सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विवेक आलोणी यांनी केले. कार्यक्रमाला निवृत्‍त न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, वि.सा.संघाचे सरचिटणीस विलास मानेकर आदींची उपस्थिती होती.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा