हिमाचल प्रदेशात 48 तासात 52 जणांचा मृत्यू

0
178

शिमला, 15 ऑगस्ट : हिमाचलप्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेली ढगफुटी, भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये गेल्या 48 तासात 52 जणांचा मृत्यू झालाय. राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.

शिमल्याच्या शिवबावडी मंदिरात सोमवारी दरड कोसळली. श्रावणातील शेवटच्या सोमवारी 20 ते 25 लोक मंदिरात आरती करत होते. रेल्वे ट्रॅक टेकडीचा सर्व ढिगारा आणि देवदाराची मोठी झाडे मंदिरावर पडून मंदिर उद्ध्वस्त झाले. यानंतर बचावकार्य सुरू झाले. आतापर्यंत मंदिरात गाडलेले 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, अजून 10 ते 15 जण गाडले जाण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली दबून 24 तासांहून अधिक काळ लोटला आहे. या परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने बचावकार्य थांबवावे लागले होते. मंदिर परिसरात सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत बचावकार्य सुरू होते. तोपर्यंत आणखी काही मृतदेह सापडले होते. परंतु, डोंगरावरून आणखी एक दरड कोसळल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही. शिमल्यात आज, मंगळवारी सकाळपासून पाऊस थांबला आहे. अशा परिस्थितीत बचावकार्य पुन्हा सुरू झाले आहे. ज्यांचे मृतदेह शिव बावडी मंदिरातून काढण्यात आले आहेत. त्यांचे आज, मंगळवारी आयजीएमसी शिमला येथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल. दरम्यान सोलन जिल्ह्यातील मामलिगमध्ये काल दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला होता. त्यांचे शवविच्छेदन करून आज, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

राज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये मंडी येथे 19, शिमला येथे 16, सोलन येथे 10, सिरमोरमध्ये 4 तर हमीरपूर, कांगडा आणि चंबा येथे प्रत्येकी एक असे एकूण 52 जणांचे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा