
नागपूर- आपला तिरंगा चंद्र सूर्य असेपर्यंत सन्मानाने डौलाने फडकत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 500 विशेष अतिथींना बोलावले आहे. यात शेतकरी, उत्पादक कंपनीचे सामान्य कारागीर, सफाई कर्मचारी, बांधकाम कामगार आदींना बोलवण्यात आले. देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
फडणवीस म्हणाले, “मेरी माटी, मेरा देश” या अभियानांतर्गत एका सन्मानाची अभिमानाची भावना आपल्या मनात तयार होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासन शेवटच्या माणसाचे स्वप्न पूर्ण करत विकासाकडे जात असल्याचा विश्वास व्यक्त केला.
गडचिरोली दौऱ्यावर जाण्याविषयी बोलताना, मला आज समाधान आहे. गडचिरोली पोलिसांनी दाखवलेल्या शौर्यासाठी या वर्षभरात त्यांना 64 पदके मिळाली आहेत. कदाचित देशात सर्वाधिक पदके ही गडचिरोली पोलिसांना मिळालेली आहेत. त्यांच्या शौर्यासाठी, कार्यासाठी शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांना ती मिळालेली आहे. पण त्यांचे काम संपलेले नाही. भटकलेला एक जरी व्यक्ती शिल्लक असेल, त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी पोलिसांना अहोरात्र सज्ज राहून काम करावे लागेल. कारण देश विघातक शक्ती माओवाद्यात पोहोचलेली आहे. निश्चितपणे गडचिरोली आणि महाराष्ट्र पोलीस याबाबतीत सदैव सजग राहील असेही स्पष्ट केले. मुख्यमंत्री आणि आम्ही घोषणा केली होती की, हळूहळू पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गडचि रोलीचा संपर्क 365 दिवस कायम करू. यातील पहिल्या टप्प्यातील पुलाचे उद्घाटन आज करतो आहे. आज अनेक गावांचा तुटणारा संपर्क दूर होऊन गडचिरोलीशी संपर्क पूर्णपणे बारमाही होणार आहे.