भ्रष्टाचार, तुष्टीकरण, परिवारवादाच्या विरोधात लढा देणार-पंतप्रधान

0
147

नवी दिल्ली-स्वातंत्र्यदिनी (Independence Day) लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भ्रष्टाचार, तुष्टीकरण आणि परिवारवादाच्या विरोधातील लढा या आपल्या तीन कमिटमेंट असल्याची घोषणा केली. भ्रष्टाचाराच्या विरोधात माझा लढा सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिवारवादाने देशाला ओरबाडलं, जखडून ठेवलं असून त्याने लोकांचा हक्क हिरावला आहे. तुष्टीकरणाने देशाच्या मुलभूत चिंतनाला, चारित्र्याला डाग लावला आहे. गरीब, मागास, आदिवासी, पसमांदा मुस्लिमांचे हक्क हिरावले जातात. या तिन्ही गोष्टींविरोधात आपल्याला लढायचे असल्याची घोषणा त्यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या आपल्या दहाव्या भाषणातून केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहाव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. (PM Narendra Modi Red Fort Speech) यावेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली.

बहुचर्चित मणिपूर हिंसाचाराचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, मणिपूरमध्ये हिंसाचारामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. माता आणि मुलींच्या अब्रुशी खेळले गेले. मात्र काही दिवसांपासून शांततेच्या बातम्या येत आहेत. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. केवळ शांततेतून मार्ग निघेल व या समस्या सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार मिळून भरपूर प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.

आज आपल्याकडे लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता आहे. या तिन्हींमध्ये मिळून देशाची स्वप्ने साकार करण्याची क्षमता आहे. मी गेल्या एक हजार वर्षांबद्दल बोलत आहे, कारण मला दिसत आहे की देशाला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. सध्या आपण ज्या युगात वावरत आहोत, त्या काळात आपण जे काही करतो, आपण जी पावले उचलतो आणि घेतलेले निर्णय एकामागून एक सोनेरी इतिहासाला जन्म देतात. तुम्ही 2014 मध्ये मजबूत सरकार बनवले. 2019 मध्ये तुम्ही सरकार स्थापन केले तेव्हा मला सुधारणा करण्याचे धैर्य मिळाले. सुधारणा केल्यावर नोकरशाहीने परिवर्तनाची जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. त्याच्याशी जनता जोडली गेली. यातूनही परिवर्तन दिसून येते. आपली युवा शक्ती केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विश्वकर्मा योजना

देशात राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा लोकांना मोठा फायदा झाला असतानाच येत्या महिन्यात विश्वकर्मा जयंतीला १३-१५ हजार कोटी रुपयांसह नवीन बळ देण्यासाठी आम्ही विश्वकर्मा योजना सुरू करू, अशी घोषणा मोदींनी यावेळी केली. २०१४ मध्ये आम्ही आलो तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत आम्ही 10व्या क्रमांकावर होतो. आज आपण पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर पोहोचलो आहोत. भ्रष्टाचाराचा राक्षस देशाला धरून होता. आम्ही हे सर्व थांबवले. मजबूत अर्थव्यवस्था तयार केली. गरिबांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याचे नियोजन केले. आज देशाची ताकद वाढत आहे. एक एक पैसा गरिबांसाठी खर्च करणारे सरकार असेल, तर त्याचा परिणाम काय होतो, ते पाहता येईल. मी तिरंग्याखालील १० वर्षांचा हिशोब देत आहे, असेही मोदी म्हणाले. महिलांच्या सबलीकरणासाठी देशात २ कोटी ‘लखपती दीदी’ चे लक्ष्य घेऊन आम्ही काम करीत असल्याचे यावेळी मोदी यांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा