माणुसकीला काळिमा फासणारी घटना.. चक्क महिलेचा कुत्र्यावर अॅसीड हल्ला

0
48

मुंबई : एका महिलेने कुत्र्यावर अॅसीड हल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड मालवणीमध्ये सामनानगर परिसरात हा प्रकार उघडकीस आला असून ही घटना १६ ऑगस्टची असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Acid attack on Dog) सबिस्ता सुहेल अंसारी असे या ३५ वर्षीय महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबिस्ता अन्सारी या महिलेने आपल्या घरात मांजर पाळलं आहे. एक कुत्रा या मांजरीसोबत खेळायचा. तो मांजरीच्या मागे लागायचा. त्याचा राग मनात धरून या महिलेने कुत्र्यावर चक्क अॅसीड हल्ला केला. यामुळे कुत्रा जखमी झाला असून सीसीटीव्ही फुटेजमध्येही हा प्रकार रेकॉर्ड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, रात्री साडेबाराच्या सुमारास इमारतीच्या आवारात कुत्र्याचा भुंकण्याचा व विव्हळण्याचा आवाज ऐकून लोक जागे झाले. महिलेने बाटलीतील अॅसीड कुत्र्यावर फेकल्याचे लक्षात आले. कुत्र्याचा एक डोळा निकामी झाला असून शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. टीव्ही अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनी कुत्र्याला त्यांच्या थँक यू अर्थ या एनजीओमध्ये नेले आहे. एनीओद्वारे संचालित वैद्यकीय केंद्रात कुत्र्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. सोसायटीच्या अध्यक्षांनी केलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी भादंवि कलम 429 आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे कलम 11 (1), आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा