महाराष्ट्रासह मध्यभारातात पावसाचा जोर वाढणार

0
32

 

 

 

मुंबई, 18 ऑगस्ट : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये शनिवार 19 ऑगस्टपासून मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळं नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर पुनरागमन केले आहे. गुरुवार पासून मुंबईसह कोकणातील काही भागांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. त्यानंतर आता राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात पुढील 48 तासांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता वरुणराजा बरसणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, अमरावती आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान खात्याने दोन्ही विभागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भात नागपूरसह काही भागांमध्ये गुरुवार पासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळं खरीप हंगामातील पीके संकटात सापडली होती. परंतु आता पावसाचे पुनरागमन होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे मुंबई, पुणे आणि कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा