बुरख्याआडचे नक्षली आव्हान

0
146

नक्षलवादी नेहमी वंचित, शोषितांची सत्ता आणण्याची भाषा बोलतात. पण, ती सत्ता आणण्यासाठी त्यांना लोकशाहीचा मार्ग पसंत नाही. त्यांना हव्या असलेल्या सत्तेचा मार्ग बंदुकीच्या नळीतूनच जातो, अशी नक्षल्यांची भूमिका आहे. त्यांची सशस्त्र क्रांती याच वंचित, शोषित समाजातील निरपराध लोकांच्या जीवावर उठली आहे. या नक्षली विचारसरणीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तीव्र विरोध केला आहे. नेपाळमधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत बोलताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माओप्रणित साम्यवाद, माओची विचारसरणी, त्याचा विचार समाजाला धोकादायक आहे, असे त्यांनी स्पष्ट म्हटले होते. या भाषणात ते म्हणाले होते – “भगवान बुद्धाचा प्रेमाचा मार्ग माओप्रणित साम्यवाद्यांना पसंत नाही. त्यांना हिंसेचाच मार्ग आवडतो. त्यामुळेच या विचारधारेचा धोका समाजाला अधिक आहे.” गेल्या दोन-तीन दशकांमध्ये नक्षली हिंसाचाराचे जे चटके भारतीय समाजाने सोसले आहे, ते पाहता बाबासाहेब किती दूरदृष्टीचे होते व भविष्याचा वेध घेणारे होते, हे ध्यानात येते. गेल्या दोन-अडीच दशकांत नक्षली हिंसाचारात 15 हजाराहून अधिक लोक ठार झालेत. यातील तब्बल 9 हजार लोक हे सर्वसामान्य निरपराध नागरिक-गावकरी आहेत.

आचार्य चाणक्य राष्ट्राच्या संरक्षणव्यवस्थेबाबत सांगतात – “कोणत्याही राष्ट्राला बाह्य शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रू सर्वाधिक धोकादायक असतात. कारण राष्ट्राचे बाह्य शत्रू सहसा दृश्य असतात. मात्र, अंतर्गत शत्रू हे छुपे असतात.” भारताचा अनुभव पाहता आचार्य चाणक्यांचे विचार पुरेपूर खेरे ठरतात. भारताला सीमेच्या पलीकडील शत्रूंपासून जितका धोका आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक धोका सीमेच्या अलीकडे, म्हणजेच देशाच्या आत राहणाऱ्या अंतर्गत छुप्या शत्रूंपासून आहे. जिहादी अतिरेकवादाला आसरा देणारा पाकिस्तानसारखा देश व सतत विस्तारवादाच्या उन्मादात वावरणारा चीनसारखा देश भारताच्या सीमेवर आहे. बाहेरच्या या शत्रूंना थोपवून धरण्यासाठी भारताचे लष्कर सज्ज आहे आणि सक्षमही आहे. आतल्या शत्रूंचा सामना करण्यासाठीही देशाची सुरक्षा दलेही सक्षम आहेत. पण हे अंतर्गत शत्रू वेगवेगळ्या मुखवट्याखाली दडलेले आहेत. ते छुप्या पद्धतीने ज्याप्रमाणे देश पोखरून काढीत आहे, ते अधिक धोकादायक आहे. यात काश्मिरातील डोकं फिरलेले दहशतवादी आहेत, तर देशाच्या जंगलव्याप्त प्रदेशात हिंसक कारवाया करणारे नक्षलवादीही आहेत. त्यातही हा नक्षलवाद नावाचा अंतर्गत शत्रू अधिक गंभीर आहे. तो जेएनयुसारख्या नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये ‘तुकडे गँग’च्या रूपात जाणवतो, तर दिल्ली विद्यापीठात ज्ञानदानाच्या पवित्र कार्याच्या आड फुटिरतावादाला ‘बौद्धिक’ खाद्य पुरविणाऱ्या जी. एन. साईबाबाच्या रूपाने दिसतो. हातात डफडी घेऊन वंचित शोषित समाजावरील अन्यायाला वाचा फोडणारी गाणी आवेशाने म्हणत हळूच माओची हिंसक विचारधारा गळी उतरवणारे कला मंच एकीकडे असतात, तर दूर जंगलात बंदुकीच्या जोरावर राज्य करणारे नक्षली दलम… काही ठिकाणी ते विद्रोही कवी, साहित्यिक बनतात, तर काही ठिकाणी विकासकामांमुळे विस्थापित होणाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी लढणारे मानवतावादीही असतात. तर काही ठिकाणी कायद्याची मदत करणारी… ही सारी मंडळी दिसायला वेगवेगळी असतात… वावरतातही ते वेगवेगळ्या मानवतावादी मुखवट्यांनी. पण प्रत्यक्षात ती एकच असतात… नक्षलवादी… माओवादी… आणि त्याची प्रेरणाही एकच असते – माओवादाची सत्ता बंदुकीच्या नळीच्या माध्यमातून आणणे…

येथे एक लक्षात घेतले पाहिजे की नक्षलवाद व माओवाद हे वेगवेगळे नाहीत. ते एकच आहे. माओने पुरस्कृत केलेली विचारसरणी म्हणजेच माओवाद. माओला लोकशाही मान्य नाही. तो म्हणतो – “समाजातील पीडित, वंचित गटाला सत्तेत आणण्यासाठी सशस्त्र बंड करून प्रशासन उद्ध्वस्त केले पाहिजे व त्या हिंसाचाराच्या बळावरच सरकार उलथवून टाकले पाहिजे. वंचिताची कोणतीही सत्ता बंदुकीच्या नळीद्वारे येणाऱ्या क्रांतीतूनच जन्माला येते.” माओचे हेच धोरण नक्षलवादी प्रत्यक्षात आणतात. भारतातील या विचारधारेच्या चळवळीचा उगम झाला पश्चिम बंगालमधील एका गावात. प. बंगालमधील आदिवासी क्षेत्रात सत्तरच्या दशकापर्यंत धनदांडग्या जमीनदारांचा दबदबा होता. हे जमीनदार अत्याचाराचे प्रतिबिंब होते. ते जबरदस्तीने व वेळ पडली तर रक्तपात करवून आदिवासींकडील जमिनी हिसकावून घेत. अशा रितीने येथला आदिवासी समाज भूमिहीन झाला. जमीनदारांच्या शोषणाचा तो बळी पडू लागला. या भूमिहीन आदिवासींना त्याच्या जमिनी परत मिळवून देण्याचे एक आंदोलन माओवादाचे पुरस्कर्ते असलेल्या चारू मुजूमदार, कानू सन्याल व जंगल संथाल या तिघांनी सुरू केले. हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. त्यात काही निष्पाप आदिवासी मारले गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या मुजूमदार-सन्याल जोडीने बंदूक हातात धरली… मे 1967 मधील ही घटना. ज्या गावात ही घटना घडली, ते गाव होते नक्षलबाडी. तेथून जन्माला आलेली चळवळ म्हणून या चळवळीला नाव पडले नक्षली चळवळ… मूळ विचारधारा माओप्रणित सशस्त्र हिंसक बंड…

माओवाद, साम्यवाद नेहमी दलित, शोषित, वंचितांना न्याय देण्याची, वंचित-शोषितांची सत्ता आणण्याची भाषा बोलतात. पण, ही भाषा फसवी आहे. पण, ती सत्ता आणण्यासाठी त्यांना लोकशाहीचा मार्ग पसंत नाही. त्यांना हव्या असलेल्या सत्तेचा मार्ग त्यांच्या मते बंदुकीच्या नळीतूनच जातो, अशी नक्षल्यांची भूमिका आहे. माओवादी विचारसरणीतील ढोंग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फार अगोदर ओळखले होते. 20 नोव्हेंबर 1956 रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे जागतिक बौद्ध परिषद झाली होती. या बौद्ध परिषदेत बोलताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माओप्रणित साम्यवादाला तीव्र विरोध केला होता. माओची विचारसरणी, त्याचा विचार समाजाला धोकादायक आहे, असे त्यांनी स्पष्ट म्हटले होते. या भाषणात ते म्हणाले होते – “भगवान बुद्धाचा प्रेमाचा मार्ग माओप्रणित साम्यवाद्यांना पसंत नाही. त्यांना हिंसेचाच मार्ग आवडतो. त्यामुळेच या विचारधारेचा धोका समाजाला अधिक आहे.” गेल्या दोन-तीन दशकांमध्ये नक्षली हिंसाचाराचे जे चटके भारतीय समाजाने सोसले आहे, ते पाहता बाबासाहेब किती दूरदृष्टीचे होते व भविष्याचा वेध घेणारे होते, हे ध्यानात येते. गेल्या दोन-अडीच दशकांत नक्षली हिंसाचारात 15 हजाराहून अधिक लोक ठार झालेत. यातील तब्बल 9 हजार लोक हे सर्वसामान्य निरपराध नागरिक-गावकरी आहेत.

2005 ते 2011 या सहा वर्षांत तर नक्षली क्रौर्याचे बिभत्स रूप भारताने बघितले आहे. त्यातही 2009-10 या दोन वर्षांत 2 हजारांवर बळी या हिंसाचाराने घेतले आहेत. 2010 मध्ये एकाच मे महिन्यात नक्षल्यांनी घडवून आणलेल्या रेल्वे अपघातात 150 व बॉम्बस्फोटात 44 निरपराध लोक मारले गेले. याच वर्षात एप्रिल महिन्यात छत्तीसगड राज्यामधील दंतेवाडा जिल्ह्यात हजारावर नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यात 76 सुरक्षा जवान शहीद झालेत. याच राज्यात सुकमा गावात 25 मे 2013 रोजी नक्षल्यांच्या हल्ल्यात विद्याचरण शुक्ला, महेन्द्र कर्मा, नंदकुमार पटेल यासारखी काँग्रेसची ज्येष्ठ नेतृत्वफळीच संपली. दीर्घकाळ सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने नक्षली चळवळीला पोषक असणारे जे धोरण अवलंबले, त्याचा जबर फटका या घटनेने काँग्रेसला दिला. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील 10 राज्यातील 68 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा प्रभाव आहे व त्यातील 35 जिल्ह्यांमध्ये हा 90 टक्के नक्षलवाद एकवटला आहे.

नक्षलवाद हा देशासमोरचा धोका आहे आणि त्यांच्या साहित्यात त्याचे शेकडो पुरावे दिसून येतात. माओवाद्यांच्या धोरणांचे स्पष्टीकरण करणारे एक पुस्तक आहे. ‘स्ट्रॅटेजी एण्ड टॅक्टिज ऑफ इंडियन रिव्हॉल्यूशन’ हे त्याचे नाव. त्यात ते काय म्हणतात – “भारताची राजकीय सत्ता प्रदीर्घ युद्धाद्वारे ताब्यात घेणे, हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी माओवादी लष्कर उभारून भारतीय लष्कर, पोलिस आणि संपूर्ण प्रशासन नष्ट करणे, हेच माओवादी क्रांतीचे मुख्य स्वरूप असेल.” रक्तपाताच्या कोणत्याही स्तरावर जाण्याची नक्षल्यांची तयारी असते. त्यावेळी त्यांना शोषित, वंचित हे शब्द आठवत नाही. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील तोळका या गावातील एक घटना नक्षल्यांच्या क्रौर्याची ओळख पटवून देणारी आहे. या गावात आयोजित जनअदालतीत माओवाद्यांनी तातू नावाच्या इसमावर काही आरोप ठेवले. त्याला बेदम मारहाण सुरू केली. त्यात संधी साधून तातूने पळ काढला. तातूने पळ काढल्याने एक प्रकारे नक्षल्यांची फजितीच झाली. त्यामुळे नक्षली चवताळले. त्यांनी तेथेच उभ्या असलेल्या तातूच्या बायकोच्या हातातील चार महिन्याच्या मुलाला, सोमरूला हिसकले. त्या चिमुकल्याला लोखंडी सळाकीने टोचून टोचून मारले व तेथेच त्याच्या आईसमोर जमिनीत पुरून टाकले. कुठेही पोलिसांसोबतच्या चकमकीत नक्षली ठार झाले की, मानवतेचा कळवळा येणाऱ्या व सत्याशोधनाच्या नावाखाली त्यांना हवे असलेले पोलिसी कारवाईच्या विरोधातील निष्कर्ष काढून त्याचा गवगवा करणाऱ्या तथाकथित मानवतावाद्यांना तोळकातील चिमुकल्या सोमरूचा मानवाधिकार का आठवत नाही, हा प्रश्नच आहे…

या तथाकथित मानवतावाद्यांचे हे ढोंगी मानवताप्रेमही नक्षली चळवळीच्या रचनेचा एक भाग आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. यासाठी या चळवळीची रचना समजून घेणे आवश्यक आहे. ही रचना त्रिस्तरीय आहे. सर्वोच्च पातळीवर आहे, पॉलिट ब्युरो ही सेंट्रल कमिटी, म्हणजेच सर्वोच्च समिती. तीच चळवळीची धोरणे ठरविते ती धोरणे राबविण्यासाठीचा मार्ग निश्चित करते. दुसरा स्तर आहे, शहरी फ्रंट संघटनांचा. आणि सर्वात खालच्या तिसऱ्या स्तरात असतात जंगलात राहून हिंसाचार घडवून आणणारे सशस्त्र दलम. आपल्यासमोर प्रकर्षाने जो समोर येतो तो हाच तिसऱ्या स्तरात असलेला दलमचा सदस्य, म्हणजेच हातात बंदूक घेतलेला नक्षली, त्यांचे क्रौर्य. पण या चळवळीच्या दुसऱ्या स्तराकडे आपले लक्षच जात नाही… कारण हा स्तर मुळातच छुपा असतो… वेगवेगळ्या मोहक मुखवट्यांच्या आत त्या संघटनाचा मूळ चेहरा लपला असतो. आणि तोच अधिक धोकादायक असतो. हा स्तर कधी पुरोगामी विचारवंतांच्या बुरख्याआड असतो, तर कधी मानवतेची जपमाळ ओढणाऱ्या ढोंगी मानवतावाद्यांच्या मागे दडला असतो. गाणी-पथनाट्यांद्वारे माओवाद पेरणारी कलापथके या स्तराचाच भाग असतात, तर मानवाधिकाराच्या नावाआड नक्षल्यांना आर्थिक, न्यायालयीन, बौद्धिक मदत करणाऱ्या संघटनाही नक्षलवाद्यांना पूरक असेच काम करीत असतात. 2009-10 मध्ये नक्षली हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने सुरक्षा दलांनी कठोर भूमिका घेतली. त्यामुळे 2011-12 मध्ये काही प्रमाणात त्यात घट झाली होती. त्याचा संदर्भ घेऊन एका न्यायालयीन प्रकरणात केंद्र सरकारने नोव्हेंबर 2013 मध्ये एक प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते. त्यात म्हटले होते की, “जंगलातील माओवादी हिंसाचारावर अंकुश आला असला तरी शहरी फ्रंट संघटनांनी आता माओवादी चळवळ जिवंत ठेवली आहे. या संघटना जंगलातील सशस्त्र दलमपेक्षाही अधिक घातक आहेत.” हे प्रतिज्ञापत्र ज्या केंद्रीय गृह खात्याने सादर केले होते, त्यावेळी या खात्याचे पर्मुख, म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री होते, काँग्रेसचे डॉ. पी. चिदंबरम.

या शहरी फ्रंट संघटनांची व्याप्ती आता जगजाहीर झाली आहे. दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक राहिलेल्या जी. एन. साईबाबा हा सतत व्हीलचेअरवर खिळून असलेला चलाख ‘मेंदू’ आता तुरुंगात आहे. गडचिरोली न्यायालयाने त्याला जन्मठेप ठोठावून या शहरी नक्षलवादावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतर नागपूर विद्यापीठातील प्रा. शोमा सेन, वकिली व्यवसाय करणारे सुरेन्द्र गडलिंग, पंतप्रधान फेलोशीप मिळवणारा पदवीधर तरुण महेश राऊत, सामाजिक कार्य करण्याचा दावा करणारा सुधीर ढवळे यांनाही पोलिसांनी गजाआड केले आहे. ही सारी मंडळी समाजात मान्यवर म्हणून ओळखली जातात. त्यामुळेच त्यांच्यावर कुणी संशय घेऊ शकत नाही. ही मंडळीच नक्षल्यांच्या या शहरी फ्रंटचा छुपा चेहरा आहे. तो दिसत नाही, म्हणूनच त्याचा धोका लक्षात येत नाही…
विदर्भात नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्याला लागून एकीकडे छत्तीसगढ व दुसरीकडे तेलंगणा ही राज्ये आहेत. ही राज्ये व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील जंगल परिसरात गेल्या तीन दशकापासून नक्षल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. कोणताही विकास नाही, रस्ते नाही, शिक्षणाचा गंध नाही, आदिवासी समाजाचे प्राबल्य, गरिबी, अन्य कोणत्याही सोयीसुविधांचा अभाव… देशभरातील सर्वच जंगलव्याप्त दुर्गम परिसरातील परिस्थिती अशीच असते. याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन नक्षली तेथे शिरकाव करतात. इथली शासकीय, प्रशासकीय यंत्रणा तुम्हाला सुख देऊ शकत नाही, ते मिळवून घ्यायची असेल, तर एक व्हा, न्यायासाठी संघर्ष करा… असे गोड आवाहन कधी रक्ताळलेल्या हिंसाचारात बदलले, हे कुणालाच कळले नाही. पण जेव्हा ते कळले तेव्हा खूप उशीर झाला आणि मग बंदुकीच्या गोळ्यांच्या सहाय्याने नक्षली उन्माद या परिसरात फोफावू लागला. पण गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने नक्षलग्रस्त दुर्गम भागात विकासाच्या विविध योजना आणल्यात. तेथील लोकांनाही नक्षली चळवळीचे फसवे रूप लक्षात यायला लागले. परिणामी जंगलातील आदिवासी पाड्यांमधील घराघरातून नक्षल्यांना मिळणारी मदत बंद झाली. खरंतर नक्षल्यांच्या अखेरच्या घरघरीचा तो प्रारंभ होता, असे म्हणायला हरकत नाही.
पण, नक्षली चळवळ केवळ या दुर्गम भागात वावरणाऱ्या नक्षली दलमच्या भरोशावर जिवंत नाही. हे दलम म्हणजे केवळ हिंसक कारवाया करणारी शस्त्रसज्ज असलेल्या टोळ्या आहेत. त्यांना वैचारिक खाद्य पुरविणारी पुरोगामी डाव्या विचारवंतांची टोळकी बाहेरच्या शहरी वातावरणात वावरत आहे. या टोळक्यांचा प्रभाव कुठवर पसरला आहे, हे दिल्ली विद्यापीठातील प्रो. साईबाबाच्या प्रकरणाने जगजाहीर झाला आहे. नक्षली चळवळींचा वैचारिक व तात्विक आधार असलेल्या डाव्या माओवादी विचाराला मुळातच लोकशाहीप्रेरित आंदोलन अपेक्षित नसते. वैचारिक वादविवादाला नक्षली चळवळीत स्थान नाही. सर्वोच्च संघटनेने दिलेल्या आदेशानुसार हिंसाचाराच्या घटना घडवून आणायच्या व त्याद्वारेच सत्ता हस्तगत करायची हीच त्यांची क्रांतीची खरी कल्पना आहे. प्रत्यक्ष हिंसाचार घडविण्यासाठीचे हात त्यांना या गरीब, अविकसित जंगल क्षेत्रातून सहज मिळतात. फक्त गरज असते, या क्षेत्रातील तरुणांची डोकी भडकावण्याची… या तरुणांना गळी उतरवण्यासाठी त्यांचे ब्रेनवॉश करणारी व मागे राहून त्यांचे नेतृत्व करणारी डोकी हवी असतात. ती विविध शहरी संघटनांमधून मिळवण्याची व्यूहरचना माओवाद्यांची आहे. त्यासाठी तुफान अशी शब्दबंबाळ भाषणे करून व जलसे, शाहिरी, क्रांतीगितांद्वारे आक्रमक तरुणांना एकत्र करण्याची मोहीम या शहरी संघटनांच्या माध्यमातून सुरू असते.
शहरी वातावरणात व उच्चभ्रू समाजात वावरणारी आणि प्रोफेसर, पत्रकार, वकील, कलाकार या बुरख्याआड ही टोळकी या नक्षली दलमला वैचारिक खाद्य पुरवीत असतात. हीच टोळकी म्हणजे नक्षली संघटनांच्या त्रिस्तरीय रचनेतील दुसरा छुपा स्तर. साईबाबाला जन्मठेप झाल्यानंतर या टोळक्यांना धक्का बसला होताच. आता ज्या पद्धतीने महाराष्ट्र, छत्तीसगढ व तेलंगणा या तिन्ही राज्यातील सुरक्षा दल परस्पर समन्वय ठेवून नक्षल चळवळ चिरडून काढीत आहे. त्यामुळे या पुरोगामी डाव्या विचारवंत टोळक्याच्या नांग्याही ठेचल्या गेल्या आहेत, हे विशेष.

अलीकडे या शहरी फ्रंटची कार्यपद्धतीही बदलली आहे. नक्षल्यांच्या पॉलिट ब्युरोने मान्य केलेले एक पुस्तक आहे. शहरात चळवळीचे काम करण्याबाबतचे मार्गदर्शन करणाऱ्या या पुस्तकाचे नावच मुळी ‘शहरी काम के बारे मे’ असे आहे. त्यात सांगितले आहे की, “स्वतः एखादी संघटना काढण्यापेक्षा प्रस्थापित असलेल्या इतर संघटनांमध्ये घुसखोरी करायची, त्यांचा विश्वास संपादन करायचा, तेथे चिथावणीखोर भाषणे करून सरकार व सरकारी यंत्रणांविरोधातील व समाजातील उच्चवर्णीयांच्या विरोधात असंतोष चेतवायचा, त्याद्वारे हिंसाचाराला खतपाणी घालायचे, तो घडवून कसा आणता येईल हे पहायचे आणि प्रत्यक्ष हिंसाचार झाला की हळूच त्यातून बाजूला होऊन आपण नामानिराळे व्हायचे…” भीमा कोरेगावमधील हिंसाचाराचा माओवादी कंगोरा हा नक्षली शहरी फ्रंटच्या नव्या रणनीतीची चाहुल आहे. ही रणनीती केवळ देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका आणणार नाही, तर या देशातील सामाजिक एकतेची वीण उसवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातून देशात सामाजिक यादवी निर्माण करण्याचा कट रचल्या जात आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे आणि त्यावर अधिक गंभीरतेने विचार करून कठोर उपाययोजनाही केली पाहिजे.

 

– मंजूषा कोळमकर
नागपूर
mkolamkar@gmail.com

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा