
मुंबई MUMBAI : लोकसभेच्या निवडणूक अद्याप दूर असली तरी राजकीय पक्षांचे नियोजन सुरु झाले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. (MP Sanjay Raut to contest from North-East Mumbai LS) यासंदर्भात लवकरच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
खासदार राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. मी लोकसभा लढवावी, अशी पक्षाची इच्छा असल्याचे राऊत म्हणाले. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याबद्दल पक्षाने म्हटले असल्याचेही राऊत यांनी सांगितले. राऊत म्हणाले, पक्षाने आदेश दिला तर आम्ही काहीही करतो. आम्ही बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेले लोक आहोत. पक्षाची गरज आणि पक्षप्रमुखांचा आदेश जो असेल, तो मानणाऱ्यांपैकी मी आणि माझं कुटुंब आहे. ईशान्य मुंबईत संजय राऊत सोडून द्या. आमचा साधा शिवसैनिक जरी उभा राहिला तरी तो किमान दोन ते सव्वा दोन लाख मतांनी विजयी होईल, अशी ईशान्य मुंबईची स्थिती असल्याचा दावा राऊतांनी केलाय. सध्या येथून भाजपचे मनोज कोटक हे खासदार आहेत. कोटक यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा पराभव केला होता.
