
अकोला – सकल मराठा समाज खामगांवच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर टॉवर चौक येथे ८ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर पर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाज बांधव अतिशय शांततेने आंदोलन करुन मराठा समाज आरक्षणाची व जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता आंदोलन करीत असलेल्या मराठा समाज आंदोलकावर लाठीचार्ज केलेल्या घटनेचा निषेध करुन या घटनेतील आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. सोबतच मनोज पाटील जरांगे यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्याकरिता हे आंदोलन करीत आहोत उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर टॉवर चौक येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनला शहरातील विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष, मंडळ यांच्याकडून सकारात्मक पाठिंबा देण्यात आला.
मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही योग्य असून सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे यासाठी सर्व सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष तसेच मंडळ यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन हे विविध स्तरावर सुरुच राहणार आहे. सकल मराठा समाजाने आज जिल्हाधिकारी कार्यालायावर मोर्चा काढला तसेच आंदोलनाचा भाग म्हणून १३ सप्टेंबर बुधवार रोजी बुलढाणा येथे जिल्हा पातळीवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारने मराठा समाजाला ठोस असे आरक्षण द्यावे जे कायद्याने सशक्त व मजबूत राहील, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. आतापर्यंत मराठा समाजाने संपूर्ण आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत केले असून जर समाजाची मागणी पूर्ण न झाल्यास या आंदोलनाला उग्र स्वरुप येऊ शकते आणि या सर्व बाबीस सरकार जबाबदार राहील, असा इशारा सुद्धा यावेळी किशोर भोसले (समन्वयक, सकल मराठा समाज) यांनी दिला.
