जरांगेंची सरकारला १ महिन्यांची सशर्त मुदत

0
25

जालना-मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या आंतरवाली सराटीत सुरू असणाऱ्या आंदोलनावर सध्या तोडगा निघण्याची शक्यता आहे. (Maratha Reservation Agitation) मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारला १ महिन्याचा कालावधी जरांगे यांनी दिला असून त्यांनी पाच अटीही सरकारपुढे ठेवल्या आहेत. मराठा आरक्षणासंबंधी सरकारने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल कसाही येवो, मराठ्यांना ३१ व्या दिवशी कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू झाले पाहिजे, अशी लेखी हमी त्यांनी मागितली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाप्रकरणी महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झाले, ते सर्व मागे घेतले पाहिजे तसेच लाठीचार्ज करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.
उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळ, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे यांनी आंतरवाली सराटीत उपस्थित रहावे, मुख्यमंत्र्यांनी सर्व काही लेखी लिहून द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर आजपासून ३० दिवसांनी म्हणजे १२ ऑक्टोबर रोजी विराट सभा घेतली जाईल. या सभेला महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी यायचे. सभा अशी विराट घ्यायची की मराठ्यांचे नाव घेतले तरी सरकारचा थरकाप उडाला पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणाले.
यापुढे पुढील महिनाभर आमरण उपोषणाचे रुपांतर साखळी उपोषणात करणार असून जागा सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा