आंतरभारती आश्रमाचे संस्थापक डॉ भाऊसाहेब झिटे यांचे निधन

0
25

 

नागपूर NAGPUR -अमरावती मार्गावरील  DHABHA दाभा येथील आंतरभारती आश्रमाचे संस्थापक डॉ. भाऊसाहेब झिटे यांचे आज दि. १२ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास हृदयविकाराने वयाच्या ९३ व्या वर्षी देहावसान झाले. आज दुपारी 4 वाजता दाभा येथेच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
डॉ भाऊसाहेब झिटे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील पाचगाव येथे सामान्य शेतकरी कुटुंबात २० नोव्हें. १९३० रोजी झाला. वर्ध्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. तरुण वयातच झालेल्या क्षयरोगाच्या इलाजासाठी ते नागपूरच्या डॉ. गुमास्ताकंडे दाखल झाले. उपचारानंतर भाऊ गुमास्ताकंडे डिस्पेंसर म्हणून काम करू लागले. निःस्वार्थी सेवाभाव हा भाऊंच्या वृत्तीचा स्थायीभाव असल्यामुळे त्यांनी विद्वद्रत्न डॉ.भाऊजी दप्तरी यांनी स्थापन केलेल्या नागपूरच्या होमिओपॅथिक महाविद्यालयातून डीएचबी ही पदवी १९५६ मध्ये घेतली. सन १९५९ मध्ये दाभा येथे एकेकाळी माळरान असलेल्या आजच्या आश्रमाच्या दहा एकर जागेवर आंतरभारती आश्रमाची स्थापना केली.
आंतरभारती आश्रमात अनेक उपक्रम चालतात. पण कोणत्याही उपक्रमास शासनाचे एका पैशाचेही अनुदान घेतले नाही. सेवा, शिस्त आणि नैतिक आचरण हेच या आश्रमाचे खरे भांडवल असल्याने या आश्रमात आचार्य दादा धर्माधिकारी व यदुनाथ थत्तेंसारखी माणसं अखेरच्या काळात येऊन राहिली होती. गांधीवादी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे तर वर्षातून दोन महिने येथे राहत. आचार्य विनोबा भावे यांचे बंधू शिवाजी भावे यांनी आपल्या पुस्तकाची रॉयल्टी या आश्रमास दिली आहे. ते सुद्धा या आश्रमात काही काळ राहिले होते.
१९७५ मध्ये भाऊंनी आंतरभारती होमिओपॅथीचे महाविद्यालय सुरू केले होते. येथून प्रेरणा घेऊन विदर्भातील ग्रामीण भागात आज हजारो डॉक्टर्स सेवा करीत आहेत. बी.एच.एम.एस. ही होमिओपॅथी चिकित्सकाची सरकारमान्य पदवी घेऊन दरवर्षी पन्नास विद्यार्थी येथून बाहेर पडतात. दाभ्याच्या या महाविद्यालयात पन्नास खाटांचे आंतररुग्णालय आहे. पॅथालॉजी लॅब आहे. निसर्गोपचार केंद आहे. शहरात दोन ठिकाणी व ग्रामीण भागात दोन बाह्य रुग्णालये आहेत. विद्यार्थीनींकरिता वसतीगृह आहे. सर्व उपचार करून थकलेले रोगी अखेरीस दाभ्याच्या आंतरभारती आश्रमाच्या आश्रयाला येतात हे विशेष. डॉ झिटे यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक मान्यवरांनी आंतरभारती आश्रम गाठले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा