आश्वासन मिळेपर्यंत ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरूच राहणार

0
21

नागपूर – मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र दिले जाणार नाही आणि मराठा समाजाचे ओबीसीकरण होणार नाही, असे आश्वासन सरकारकडून मिळत नाही तोपर्यंत संविधान चौकात सुरू असलेले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरूच राहणार आहे. आज मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची सांगता झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक, अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी यासंदर्भातील घोषणा माध्यमांशी बोलताना केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडविताना नेमके काय आश्वासन दिले याची माहिती कोणालाही नाही याकडे आवर्जुन ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी लक्ष वेधले. दरम्यान, आज पोळ्यानिमित्त बैल जोडीचे पूजन करून आंदोलन व उपोषणास सुरुवात झाली. माजी मंत्री आमदार सुनील केदार, जिल्हा भाजप अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, कृती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील, अवंतिका लेकुरवाळे यांच्यासह कृती समितीचे सदस्य विविध समाज संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा